शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आत्तापर्यंत ३१ कोटीहून अधिक झाडांची लागवड केली असून त्याच्या संगोपनास प्राधान्य दिले असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.
पलूस तालुक्यात कुंडल येथील कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (फॉरेस्ट अॅकॅडमी) येथे सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बठकीत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम बोलत होते. या बठकीस वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, फॉरेस्ट अॅकॅडमीचे महासंचालक नरेश झुरमुरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुरेश थोरात, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधक), अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक एन. ए. काकोडकर, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, फॉरेस्ट अॅकॅडमीचे प्राचार्य एल. डी. चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाला पर्याय नसल्याचे स्पष्ट करून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, राज्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहीम शासनाने हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत आतापर्यंत राज्यात ३१ कोटी झाडांची लागवड झाली असून यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा शासनाचा निर्धार आहे. या कामी वन विभागाबरोबरच महसूल, ग्रामविकास विभाग यासह सर्वच शासकीय निमशासकीय विभागांचे सहकार्य घेऊन वृक्षारोपणाची मोहीम लोकसहभागाद्वारे यशस्वी करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात जवळपास १० कोटी झाडे लावण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.
सांगली जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत आतापर्यंत जवळपास १० लाख झाडे लावली असून जिल्ह्यात शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागातून अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याच्या कामास सर्वानीच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले. ते म्हणाले, राज्यातील ३३ टक्के क्षेत्र वनाच्छाधित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण जनतेने वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या कामी सक्रिय व्हावे. वनखात्याकडून वनतळी व अन्य उपक्रमांसाठी २ कोटीचा निधी शासनाने सांगली जिल्ह्यास मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुंडल येथे ११ हेक्टरवर विकसित केलेली प्रबोधिनी ही राज्यातील सहावी प्रबोधिनी असून या प्रबोधिनीच्या विकासासाठी शासनाने भरीव निधी दिला आहे. या निधीतून प्रबोधिनीतील सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्ताप्रधान करावीत, अशी सूचना करून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, या प्रबोधिनीतून वनपाल, वनक्षेत्रपाल, उपविभागीय वन अधिकारी अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. १७ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या वनक्षेत्रपाल यांच्या प्रशिक्षण शिबिरास वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी भेट देऊन त्यांनाही मार्गदर्शन केले. तसेच या बठकीत या प्रबोधिनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपविभागीय वन अधिकारी एम. एस. भोसले, कार्यकारी अभियंता मुनगीलवार, विभागीय व्यवस्थापक एस. बी. चव्हाण, सहायक व्यवस्थापक डी. एम. घोरपडे आदी उपस्थित होते.
महासंचालक नरेश झुरमुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य एल. डी. चौधरी यांनी आभार मानले.
‘शतकोटी वृक्ष लागवड’ योजनेंतर्गत राज्यात ३१ कोटी झाडांची लागवड
शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आत्तापर्यंत ३१ कोटीहून अधिक झाडांची लागवड केली असून त्याच्या संगोपनास प्राधान्य दिले असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.
आणखी वाचा
First published on: 30-07-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 lakh trees planted in the state in hundred million tree planting scheme