शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असले तरी पोलीस आयुक्तालयाजवळून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परकीय चलन विनिमय कार्यालयातून तब्बल ३२ लाख रुपयांचे चलन लंपास करीत चोरटय़ांनी आपली मजल कुठपर्यंत गेली आहे, तेच दाखवून दिले. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असतानाच गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. काही दिवसांपासून गुन्हेगारांनी आपला मोर्चा दरोडय़ाच्या घटनांकडे वळविला असून पाळत ठेवून रोकड लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. दरोडय़ाच्या घटनांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना गुन्हेगारांची मजल आता थेट पोलीस आयुक्तालयाजवळील कार्यालयांमध्ये दरोडा टाकण्यापर्यंत गेली आहे. सोमवारी मध्यरात्री चायनीज मार्केटशेजारील परकीय चलन विनिमय कार्यालयातून काही संशयितांनी भारतीय, अमेरिकन आणि युरो या देशांतील ३२ लाख रुपयांचे चलन लंपास केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.