सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबोली ते माडखोल हा भाग भूकंपप्रवण क्षेत्र असल्याचे आढळून येत आहे. गेल्या दोन महिन्यांत भूकंपाचे सुमारे ३२ धक्के बसल्याची नोंद तिलारी जलविद्युत पाटबंधारेच्या मुख्य धरणावर झाली असल्याने खळबळ उडाली आहे. या भूकंप नोंदीमुळे तातडीने मेरी या संस्थेकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ७ जानेवारी २०१३ रोजी दुपारनंतर आंबोली, माडखोल, वेर्ले, सावंतवाडीसह जिल्ह्य़ात भूकंपाचे धक्के जाणवले; परंतु त्याची कोणीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. या भूकंपाचे धक्के जाणवणारा भाग सह्य़ाद्रीचा पट्टाच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तिलारी पाटबंधारे विभागाचे भूकंपमापन केंद्राचे उपअभियंता बेळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ७ जानेवारीनंतर वेळोवेळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे मोजमाप तिलारी प्रकल्प केंद्रावर झाले आहे. नाशिक येथे असणाऱ्या मेरी या संस्थेकडून याविषयी मार्गदर्शन मागितले असून त्यांना भूकंपाच्या लहरींची माहिती देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्र नसल्याने याविषयी कोणीही गांभीर्याने पाहत नव्हते, पण गेल्या दोन महिन्यांत भूकंपाचे लहान-मोठे ३२ धक्के भूकंपमापन केंद्रावर आढळून आल्याने याविषयी सरकारने गंभीरपणे या क्षेत्राकडे पाहावे अशी मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ७ जानेवारी रोजी ३.३ रिश्टर स्के ल, ८ जानेवारी १.८, ९ जानेवारी २, १० जानेवारी २ रिश्टर स्के ल, तर १२ जानेवारी तीन भूकंप झाले, त्यात २, १.०९ व २.३ रिश्टर स्केलचा समावेश आहे.
तसेच १३ जानेवारी १ रिश्टर स्केल, १४ जानेवारी रोजी तीन भूकंप झाले, त्यात २.१, १.९ व २.१ रिश्टर स्केल, तर १५ जानेवारी रोजी १.७ रिश्टर स्केल, १६ जानेवारी २ रिश्टर स्के ल, १८ जानेवारी २ रिश्टर स्के ल, २७ जानेवारी रोजी दोन भूकंपांची नोंद असून ती २.४ व २ रिश्टर स्केल अशी आहे. म्हणजेच जानेवारीत भूकंपांचे १६ ते १७ धक्के जाणवले आहेत.
भूकंपाचे एकाच भागात वरचेवर धक्के जाणवत आहेत, त्याची क्षमता कमी असली तरी २ फेब्रुवारी रोजी दोन भूकंपाचे २ व २.३ रिश्टर स्केलचे धक्केजाणवले. ६ फेब्रुवारी रोजी २.१ रिश्टर स्केल, ७ फेब्रुवारी २, ९ फेब्रुवारी रोजी १ व १.९ रिश्टर स्केल, ११ फेब्रुवारी रोजी २.९, १३ फेब्रुवारी २.५, १४ फेब्रुवारी रोजी २ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले.
तसेच १५ फेब्रुवारी रोजी २, १९ फेब्रुवारी २.१ रिश्टर स्केल, २१ फेब्रुवारी रोजी तीन धक्के जाणवले २, ३ व २ रिश्टर स्केल, तर २८ फेब्रुवारी रोजी २ रिश्टर स्केल धक्के जाणवले.
या सुमारे भूकंपाच्या ३२ धक्क्यांची नोंद तिलारी पाटबंधारे प्रकल्पावरील भूकंपमापन केंद्राने ठेवली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू आंबोली, वेर्ले, माडखोलचा पट्टाच असावा. हा भाग सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात मोडत असल्याने तेथे भूकंपाच्या हालचाली होत असाव्यात किंवा खडक सरकत असावा, असा अंदाज जाणकारांचा आहे.
भूकंपाचे हे धक्कादायक प्रकार संशोधनासाठी आव्हान ठरणारे आहेत. गेल्या दोन महिन्यांत वरचेवर हे धक्के बसल्याने त्याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

Story img Loader