कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी काल गुरुवारी उष्म्याचा कहर राहताना, सायंकाळी नंतर ढग दाटून आले. तर मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार पावसाने कराड व पाटण तालुक्यांत ठिकठिकाणी हजेरी लावली.
आज दिवसभर उन्हाचा कडाका राहिला असला तरी रात्रीच्या जोरदार पावसाने हवेत गारवा होता. सायंकाळी ६ वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात धोधो पाऊस कोसळत आहे. मान्सून ७ जूनच्या मुहूर्तापूर्वी कोसळू लागल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोयना प्रकल्पाच्या तांत्रिक वर्षांस १ जूनपासून प्रारंभ झाला असून, कोयनेच्या पर्जन्यमापन नोंदवहीवर यंदाच्या पावसाच्या नोंदींचा आज श्रीगणेशा झाला आहे. गतवर्षी २ जून रोजी धुवाधार पाऊस झाला होता. यंदा काल ३ जूनपासून जोरदार पाऊस कोसळू लागला आहे.
सध्याचा विविध प्रकल्पांतील चिंताजनक पाणीसाठा पाहता १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना शिवसागराचा पाणीसाठा जवळपास ३४ टीएमसी म्हणजेच ३२ टक्के आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा सुमारे १७ टीएमसी (१६ टक्के) होता. कोयना प्रकल्पात यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा आहे. गतवर्षीचा पाणीसाठा विचारात घेता, कोयना धरणातील आजमितीची पाण्याची स्थिती उत्तम आहे. गतवर्षी कोयनेच्या ऊर्जानिर्मितीवर मर्यादा आणण्यात आल्या होत्या. यंदा मात्र, येथील वीजनिर्मितीस मुबलक पाणीसाठा उपलब्ध राहिला. मुहूर्तावर मान्सूनचे आगमन व्हावे म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा काल गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या समाधानकारक पावसाने सुखावला आहे. मान्सून सदृश वातावरणानंतर कोसळलेल्या या पावसामुळे मान्सूनच्या मुहूर्तापूर्वीच ४ दिवस अगोदरच कोयना धरणाची पर्जन्य नोंदवही नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. काल गुरुवारी रात्री पाटण तालुक्यात सरासरी २० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात पाटण तालुक्यात कुठरे विभागात सर्वाधिक ५८ तर धरणक्षेत्रातील हेळवाक-कोयनानगर येथे पावसाची नोंदच झालेली नाही. मंडलनिहाय पाऊस असा पाटण १५, तारळे १४, चाफळ ५, मल्हारपेठ १५, मरळी ४०, ढेबेवाडी ४२, तळमावले ३२, कुठरे ५८, मोरगिरी ५, म्हावशी १४.  हेळवाक व कोयनानगर शून्य मि.मी. पाऊस झाला.

Story img Loader