इस्त्रो आणि नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातल्या ३३ शाळकरी मुला-मुलींना पहिल्यांदाच इस्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीची संधी मिळली आहे. या ३३ विद्यार्थ्यांपैकी प्रथम आलेले ११ टॉपर विद्यार्थी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट देणार आहेत.
बीड जवळील पाली गावातल्या जिल्हा परिषद शाळेत अभय वाघमारे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. इस्रोसाठी पात्र झाल्याने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कुटुंबातील व्यक्ती कधीच जिल्ह्याबाहेर देखील गेली नव्हती. पण, अभय छोट्याशा वयात इस्रोला जात आहे. अभयच्या निवडीची माहिती मिळताच कुटुंबासह ग्रामस्थांनी अभयचे अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा : “रामराज्य आल्यापासून निवडणुका घ्यायला राम…” जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला
“इस्त्रोत जाण्यासाठी निवड झाली आहे. तिथे संशोधन कसं केलं जातं, पृथ्वीचं कसं निरीक्षण होतं, संशोधक कसं काम करतात हे पाहणं महत्वाचं आहे. पुढे जाऊ आयआयटी इंजिनीअर होण्याची इच्छा आहे. इस्त्रोत जाऊन गावाचं नाव मोठं करेन,” असं अभय वाघमारे याने बोलताना सांगितलं आहे.