तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमा लागून असलेल्या गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय दाखल होत आहेत. करोनाच्या टाळेबंदीत  छुप्या मार्गाने लोक येत असल्याने येथे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान तेलंगणा येथून इंद्रावती व गोदावरी नदीच्या मार्गाने येणऱ्या ३४ लोकांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे गडचिरोलीत जंगलाच्या व नदीच्या मार्गाने नक्षलवाद्यांसोबत इतरही लोक मोठ्या प्रमाणात येजा करत असतात. सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातून ३४ नागरिक सिरोंचा नदीपात्र मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करत असतांना सिरोंचा पोलीसांनी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या ३४ नागरिकांवर गुन्हे दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

गडचिरोली पोलीस दल टाळेबंदीच्या काळात नियमांच उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत आहेत. पोलीस दलाने टाळेबंदीच्या काळात जिल्हाभर एकूण ५ हजार ३०८ वाहनांवर कार्यवाही केली असून २ हजार ५०४ वाहने जप्त केली आहे. तर संचारबंदीच्या नियमांच उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून १६ लाख ४२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले जात असतांना काही नागरिक नियम पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर जिल्हाभरात ११८ गुन्ह्यांची नोंद केली असून २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये आहे. येथे एकही करोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळालेला नाही. बाहेर जिल्ह्यातून तसेच आंतरराज्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे येत्या काळात करोनाचा धोका उद्भवू नये यासाठी गडचिरोली पोलीस दलाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे. पोलीस अधिक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व नियमांचे कठोर पालन करण्याचे निर्देश दिले आहे.

तीन ट्रक मधून प्रवास करणारे ७० मजूर ताब्यात
करोनाच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ट्रक मधून प्रवास करणाऱ्या ७० लोकांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तीन ट्रक चालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत अहोरात्र काम करित आहेत. अशातच सावली पोलिसांनी वैनगंगा नदी तपासणी नाक्यावर तीन ट्रक मध्ये विनापरवानगी प्रवास करणारे ७० मजूर ताब्यात घेतले आहे. आंध्रप्रदेश मधून हे मजूर छत्तीसगड मध्ये जात होते. तसेच ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व मजूरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Story img Loader