गडचिरोली जिल्ह्य़ात नवी १० पोलिस ठाणी

देशातील दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ३५० पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असून, त्यातील दहा पोलिस ठाणी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात सुरू केली जाणार आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील काही राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. छत्तीसगड, ओदिशा व झारखंड या तीन राज्यांत तर या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रही यात आघाडीवर आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ३५० पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांकडून तशी माहिती मागविली आहे. देशात छत्तीसगड, ओदिशा, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल या नक्षलवादग्रस्त दहा राज्याच्या रेड कॅरिडॉरमध्येच ही ३५० पोलिस ठाणी राहणार आहेत. ही सर्व पोलिस ठाणी आधुनिक पध्दतीची असतील. तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात १० पोलिस ठाणी उघडली जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव स्थानिक जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे. साधारणत: एक पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला ४ ते ५ कोटी रुपयांचा खर्च येतो. यात इमारतीसह सर्व सुविधांचा समावेश आहे. सर्वाधिक पोलिस ठाणी नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये उघडण्यात येणार असल्याचे कळते.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने १० पोलिस ठाण्यांसंदर्भातील अहवाल केंद्रीय गृह विभागाकडे पाठविला आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड व गोंदिया हे चार नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. यातील चंद्रपूर, नांदेड व गोंदिया या तीन जिल्ह्य़ांमध्ये नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना तुलनेने फारच कमी घडलेल्या आहेत.

चंद्रपूर हा नक्षलवाद्यांचा ‘रेस्ट झोन’ म्हणून ओळखला जातो, तर गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवादी अधिक आक्रमकपणे सक्रिय आहेत, त्यामुळे ही दहा पोलिस ठाणी एकटय़ा गडचिरोली जिल्ह्य़ातच सुरू केली जाणार आहेत.