खेडजवळील जगबुडी नदीत खासगी प्रवासी बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३७ जण मुत्युमुखी पडले. मृतांमध्ये १० महिलांचा समावेश आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात सात जण जखमी झाले आहेत.
महाकाली ट्रॅव्हल्सची ही बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना अपघात झाला. बसमधील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही तास बंद करण्यात आली होती. मात्र, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूंकडील वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली.

फोटो गॅलरी : खेडजवळ खासगी बस नदीत कोसळली

खेडपासून दोन किलोमीटरवर असलेल्या जगबुडी नदीवर अरूंद पूल आहे. पूलावरून जात असताना गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. सध्या नदीत पाणी नसल्याने तातडीने मदतकार्य सुरू करणे शक्य झाले. अपघातावेळी प्रवासी झोपेत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
घटनेची माहिती समजताच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव घटनास्थळी पोहोचले. अनेक शासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.