लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या जनवन योजनेअंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील १६ वसाहतींना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा हा निधी मिळणार आहे. आ. जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते राम सावंत (तुंग) यांनी दिली.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधा करण्यासाठी हा निधी मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व वसाहतीमध्ये जनवन योजना समित्या स्थापन करून त्यांच्या मार्फत वन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
गेल्या ८-९ महिन्यांपूर्वी सर्व प्रकल्पग्रस्त वसाहतींचे जनवन योजनेचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाठविण्यात आले होते. हा प्रस्ताव मंजूर होऊन त्यास निधी मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी राज्य स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांच्या मागणी व लढ्याला अखेर यश मिळाले आहे.
ज्ञानदेव पवार, शंकर लोखंडे, दीपक वाघमारे, लक्ष्मण सावंत, मारुती रेवले, बिरु येडगे, सुनील पाटील, चंद्रकांत सावंत, मिथुन पवार यांच्यासह चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.