राज्यात आज आणखी चार ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले आहेत. या चार ‘ओमायक्रॉन’बाधित रुग्णांमध्ये उस्मानाबादमधील दोन जण, मुंबईमध्ये एक आणि बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता ३२ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या चार रुग्णांमध्ये तीन पुरूष व एक महिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत आढळलेल्या ३२ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबई-१३, पिंपरी चिंचवड-१०, पुणे – २, उस्मानाबाद -२, कल्याण डोंबिवली -१, नागपूर-१, लातूर-१,वसई विरार -१ आणि बुलडाणा -१ अशी रूग्ण संख्या आहे. यापैकी २५ जणांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून सुट्टी देखील देण्यात आलेली आहे.

तर, राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट जरी ओसरल्यात जमा असली, तरी देखील आता ओमायक्रॉनरुपी नवं संकट येऊ पाहत आहे. कारण, आता जानेवारी महिन्यात मोठ्याप्रमाणावर लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला आढळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिली आहे.

“ओमायक्रोनचा संसर्ग जगात झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण केवळ मोठ्या शहरात नसून लहान शहरांतही आढळू शकतात. पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ओमायक्रोनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल”, असे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण दरम्यान सांगितले आहे . तर, लसीचे दोन डोस सर्वांना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ९२५ नवीन कोरनाबाधित आढळून आले असून ९२९ जण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय १० करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 more patients have been found to be infected with omicron in the state msr
Show comments