विधानसभा प्रश्नोत्तरे
मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत चार मातांसह ८१ बालकांचा मृत्यू झाला. हे बालमृत्यू आजाराने झालेले आहेत. चार मातांचा मृत्यू प्रसूतीसंबंधातील कारणामुळे झाला आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री सुरेश शेट्टी यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. मेळघाट व नागपूरच्या मेडिकलमध्ये झालेल्या बालमृत्यूबाबत आमदार एकनाथ शिंदे, महादेव बाबर, संभाजी पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, गोवर्धन शर्मा यांनी प्रश्न विचारला होता.  
कोळशाच्या तुटीमुळे वीज निर्मितीवर परिणाम
सर्व कोळसा कंपन्यांकडून मिळत असलेल्या कोळशामध्ये २५ टक्के तूट असल्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होत आहे, असे ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले. राज्यात नादुरुस्त संच तसेच मातीमिश्रित ओल्या कोळशामुळे महानिर्मिती वीज प्रकल्पाचे संच बंद पडत आहेत. वीज निर्मितीत घट झाल्यामुळे भारनियमन वाढत असल्याचे गेल्या ऑगस्टमध्ये आढळून आल्याचे खरे आहे काय? असा प्रश्न विजय वडेट्टीवार, वीरेंद्र जगताप, अमीन पटेल, सुभाष धोटे, नाना पटोले, सुधाकर देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. खुशाल बोपचे, नाना शामकुळे यांनी विचारला होता.  
नागपूर, यवतमाळात सिकलसेल जास्त
राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांतील सिकलसेल रुग्णासंबंधीची सांख्यिकी  माहितीची पडताळणी केली असता नागपूर व यवतमाळात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली. सिकलसेल रुग्णांच्या उपचाराबाबतचा प्रश्न आमदार चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, संजय राठोड, दीपक आत्राम, दीनानाथ पडोळे, अनिल बावनकर, वामनराव कासावार यांनी विचारला होता.         

Story img Loader