सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून यात अंगावर वीज कोसळून सासू-सुनेसह तिघा जणांचा तर भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. १५ मोठी, तर १७ छोटी जनावरे मृत्युमुखी पडली. तसेच पोल्ट्री फार्म कोसळल्याने त्यात पाचशे कोंबडय़ांचा बळी गेला. याशिवाय हजारापेक्षा अधिक घरांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्य़ात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला असून माळशिरस व करमाळा तालुक्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले. जिल्ह्य़ात २१९.३८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे एक हजार घरांची पडझड झाली. गेल्या फेब्रुवारी व मार्चमध्ये पडलेल्या वादळी वारे व अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमध्ये सुमारे पावणे चार लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले असताना आता पुन्हा वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने झोडपणे सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांपुढील संकटाची मालिका अद्यापि कायम राहिल्याचे दिसून येते.
अक्कलकोट तालुक्यातील १४ गावांमध्ये सर्वाधिक एक हजार घरांची पडझड झाली असून अनेक घरांवडील पन्हाळी पत्रे उडून गेल्याने शेकडो कुटुंबीयांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. हिंगणी येथे अवकाळी पावसामुळे झाडाखाली आसरा घेऊन थांबलेल्या दस्तगीर मियाँसाहेब जमादार (४३) याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. तर, सांगोला शहराजवळ सावंत वस्ती येथे शेतात कामे करीत असताना अचानकपणे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने सुभद्रा सुखदेव सावंत (६५) व इंदुबाई बंडू सावंत (४०) या दोघी चुलत सासू-सुना झाडाच्या आडोशाखाली थांबल्या असता त्यांच्यावर वीज कोसळली. यात दोघींचा जागीच अंत झाला. तर मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे पावसाने झोडपून काढताना घराची िभत अंगावर कोसळल्याने कमलाबाई म्हाळप्पा पडवळे (५०) या महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे शंभरपेक्षा अधिक घरांची पडझड झाली तर पंढरपूर तालुक्यात गुरसाळे येथे ६० आणि गोपाळपुरात ४० घरांवरील पत्रे उडाले. मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथे अवकाळी पावसात १०२ घरांवरील पत्रे उडून गेले तर भालेवाडी (ता. मंगळवेढा) येथे एका घराची पडझड झाली. जिल्ह्य़ात सहा ठिकाणी वीज कोसळल्याने सात मोठय़ा जनावरांचा, तर १५ छोटय़ा जनावरांचा बळी गेला. तसेच झाड कोसळूनदेखील काही ठिकाणी जनावरांची प्राणहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना प्रचलित शासन नियमानुसार आर्थिक मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात २१९.३८ मिमी पाऊस पडला असून यात सर्वाधिक ४९ मिमी पाऊस माळशिरस तालुक्यात, तर त्या खालोखाल ३९ मिमी पाऊस करमाळा तालुक्यात झाला. याशिवाय उत्तर सोलापूर-३३.२०, मोहोळ-२३.०६, दक्षिण सोलापूर-१८, बार्शी-१५, मंगळवेढा-१५, सांगोला-७.०२, माढा-८.०६, अक्कलकोट-८ व पंढरपूर-०.४ याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा