सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावच्या शिवारात पोलिसांनी-तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार देशी बनावटीचे पिस्तूल आणि २३ जिवंत काडतुसे जप्त केली. यातील एक संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातील राहणारा असून एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर कारागृहातून सुटल्यानंतर तो पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी परत न जाता फरारी होता. दुसऱ्या संशयित आरोपीलाही खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असता तो जामिनावर मुक्त झाल्यानंतर अवैध पिस्तूल विक्रीचा धंदा करीत असताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.फाईक मुस्ताक कळंबलेकर (वय ४६, रा. मिस्त्री व्हिला, शिवाजीनगर, रत्नागिरी) याच्यासह निंगोडा हणमंत बिराजदार आणि त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

जंगलगी येथे राजकुमार बिराजदार याच्या शेतात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विकण्याचा धंदा होत असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे अचानकपणे छापा टाकला. त्या वेळी फाईक कळंबलेकर याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत पुन्हा चौकशी केली असता राजकुमार बिराजदार व त्याचा भाऊ निंगोडा बिराजदार यांच्या घरातही देशी बनावटीचे तीन पिस्तूल आणि १८ जिवंत काडतुसे सापडली. ही हत्यारे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगली गेल्याचे चौकशीत आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हवालदार प्रकाश कारटकर आदींच्या पथकाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

या गुन्ह्यातील फाईक कळंबलेकर याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यात तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. एका खुनाच्या खटल्यात त्यास यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगत असताना तो पॅरोल रजेवर सुटला होता. नंतर पुन्हा कारागृहात न जाता तो फरारी होता. पोलिसांना आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून तो मंगळवेढा तालुक्यात जंगलगी येथे बिराजदार बंधूंच्या शेतात राहत असताना अवैध पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी बाळगून होता. त्याचा साथीदार निंगोडा बिराजदार यालाही मंगळवेढा तालुक्यातील एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असता मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलात त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.

Story img Loader