अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर, आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग आणि राणा दाम्पत्यामध्ये वाद वाढत चालला आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. याबाबतची निवेदनं पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याकडे देण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व घडामोडीनंतर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग अमरावतीच्या पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांना कंटाळून चार पोलिसांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत हे आरोप केले आहेत.

संबंधित व्हिडीओत रवी राणा म्हणाले की, सध्या काही संघटना पोलिसांवर प्रेम दाखवत आहेत. आरती सिंग यांच्या सांगण्यावरून या संघटनांचं पोलिसांवरील प्रेम उतू चाललं आहे. त्यांना माझा एकच सवाल आहे की, अमरावतीमध्ये आरती सिंग पोलीस आयुक्त झाल्यानंतर चार पोलिसांनी आत्महत्या केली. त्यांनी आरती सिंग यांना कंटाळून आत्महत्या केली, त्यांचं कुटुंब न्याय मागत होतं. पण आरती सिंग त्यांना कधीही भेटायला गेल्या नाहीत. पण खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात काही मूठभर लोकांना समोर आणून त्यांना कॅबिनमध्ये बसवणे, त्यांचं ऐकून घेणे, त्यांचं निवेदन स्वीकारणे, हे सर्व आरती सिंग करत आहेत. गेल्या दोन वर्षात अमरावती शहराचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमरावतीत दंगे झाले, पोलिसांना धक्काबुक्की झाली, त्यावेळी या मूठभर संघटना पुढे का आल्या नाहीत? असा सवाल रवी राणा यांनी विचारला आहे.

हेही वाचा- राणा दाम्पत्याकडून अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, डॉ. आरती सिंग म्हणाल्या, “कायदेशीर कारवाई…”

पुढे त्यांनी म्हटलं की, अमरावतीत उमेश कोल्हे प्रकरण घडल्यानंतर ते दडपण्याचा प्रयत्न झाला. अमरावतीत दर आठवड्याला दोन ते तीन हत्या घडतात, कायदा सुव्यवस्था बिघडते, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, त्यावेळी या मूठभर संघटना पुढे येत नाहीत. आता केवळ आरती सिंग यांना खूष करण्यासाठी या संघटना पुढे येत आहेत. यांना कुठेतरी आरती सिंग यांनीच प्रोत्साहन दिलं आहे.

हेही वाचा- VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…

“गेल्या दोन वर्षांत सर्वसामन्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आरती सिंग यांना वेळ मिळाला नाही. पण खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात एखादं निवेदन आलं तर त्याचं स्वागत करून निवेदन घेणे, असा द्वेष आरती सिंग आमच्याविरोधात करत आहेत. त्यांनी आमच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अमरावतीत वसुली पथक चालवून अमरावतीची बदनामी केली आहे. त्यांची बदली झाली तरी त्यांच्याविरोधात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशीचा आदेश देतील, असा मला विश्वास आहे” असंही रवी राणा यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 police commits suicide tortured by police commissioner aarti singh serious allegations by mla ravi rana rmm