औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी वाघीण समृद्धी हिने चार बछड्यांना जन्म दिला आहे. यामध्ये दोन पांढ्या आणि दोन पिवळ्या पिलांचा समावेश आहे. जन्मानंतर काही मिनिटांतच नवजात बछड्यांनी दूधही पिले. समृद्धी आणि बछड्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून ही पिल्लं जन्मली आहेत. आतापर्यंत या प्राणी संग्रहालयात एकूण तीस पिलांचा जन्म झाला आहे. त्यापैकी सुमारे १० वाघ देशातील वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहेत. सध्या प्राणी संग्रहालयात नऊ वाघ आहेत. त्यात आता आणखी चार पिलांची भर पडली आहे.
यापूर्वी तीन बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण राज्यशासनापर्यंत गेले होते. त्यामुळे तत्कालीन प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यापासून धडा घेऊन प्राणिसंग्रहालयाच्या वतीने समृद्धी तिच्या पिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. समृद्धीसह बछड्यांना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. काळजी घेण्यासाठी तीन पाळ्यांत तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
समृद्धी कोण?
१९८४मध्ये पंजाबच्याच तबीर प्राणिसंग्रहालयातून पिवळे वाघ आणले होते. त्यातील दीप्ती गुड्डूने नर-मादी अशा दोन वाघांना जन्म दिला होता. त्यातीलच ही समृद्धी. सिद्धार्थ या वाघापासून तिला काही महिन्यांपूर्वी गर्भधारणा झाली होती. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास समृद्धीने बछड्यांना जन्म दिला.