कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, गेल्या २४ तासात धरणाच्या पाणीसाठय़ात ४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर पावसाची रिपरिप कायम असल्याने पाटण व कराड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत आहे. गेल्या सलग २० दिवसातील दमदार पावसाने कोयना शिवसागरात सुमारे ४८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगामाला दिलासा मिळताना जलसिंचन प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या ३ आठवडय़ातील पावसाने दुष्काळाची भीती नाहीशी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पांचा पाणीसाठा सुमारे ८० टक्के झाला आहे. सध्या -कोयना शिवसागरात सुमारे ६२ टीएमसी म्हणजेच ५९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात प्रतिसेकंद ४० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान,  वारणा, राधानगरी व तारळी प्रकल्पातून पाणी सोडणे सुरूच आहे.
गेल्या ३६ तासात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात २१६ एकूण २,८४६, महाबळेश्वर विभागात २६६ एकूण २,५८१ तर नवजा विभागात २०२ एकूण ३,३७१ मि. मी.पावसाची नोंद झाली आहे. हा सरासरी पाऊस २,९३२.६६ मि. मी. आहे. त्यात धरणक्षेत्रातील पाथरपुंज येथे सर्वाधिक ४,०३८ मि. मी. पाऊस कोसळला आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत पाटण तालुक्यात सरासरी ४१.०८ एकूण १,०२०.२५ तर, कराड तालुक्यात ८.३३ एकूण ३०६.४३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना नदीवरील पाटणनजीकचा संगमनगर धक्कापूल पाण्याखालीच असून, कराडनजीकच्या खोडशी वळण बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.

Story img Loader