Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा विकिपीडियावर असेलला आक्षेपार्ह मजकूर न हटविल्याबद्दल आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी चार एडिटर्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विकिपीडियाची कॅलिफोर्नियास्थित असलेल्या नोडल एजन्सी विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून सदर आक्षेपार्ह मजकूर हटविण्यास सांगितले गेले आहे. विकिमीडिया ही स्वयंसेवी संस्था असून त्यांच्याद्वारे विकिपीडियाचे संचलन केले जाते.

महाराष्ट्र सायबर सेलने पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर असलेला मजकूर चुकीचा आणि आक्षेपार्ह असा आहे. यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे भारतात पूजनीय आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा चुकीचा मजकूर हटविला जावा. विकिपीडियावरील माहितीमुळे लोकांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो, असेही या नोटिशीत म्हटले आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने पाठविलेल्या ई-मेलला विकिमीडियाकडून कोणतेही उत्तर न आल्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने आयटी कायद्याच्या विविध कलमाद्वारे विकिपीडियाच्या चार एडिटर्स विरोधात गुन्हा दाखल केला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विकिपीडियावरील चुकीचा मजकूर समोर आला होता. त्यानंतर यावर अधिक रोष निर्माण होऊ नये म्हणून सायबर सेलने नोटीस पाठवून मजकूर हटविण्यास सांगितले. मात्र तीन दिवसात कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर सायबर सेलने चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

कमाल आर खानने केली होती वादग्रस्त पोस्ट

बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने काही दिवसांपूर्वी विकिपीडियावरील माहिती वापरून वादग्रस्त पोस्ट केली होती. केआरकेने सोमवारी, १७ फेब्रुवारीला केलेल्या एक्सवरील एका पोस्टमध्ये विकिपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या व आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. ‘छावा’च्या प्रदर्शनानंतर केआरकेने केलेली ही वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती हटवण्याचे आदेश दिले होते.

Story img Loader