लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : बडतर्फीनंतर पुन्हा सेवेत रुजू झालेल्या एका शाळेतील शिपायाचे थकीत वेतन व अन्य देय रकमा अदा करण्यासाठी २३ हजार रूपयांची लाच घेतल्याबद्दल सोलापूरच्या भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपिकासह संबंधित शाळेतील कर्मचाऱ्याला सोलापूरच्या न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपीक संतोष जनार्दन ठाकूर (सध्या सेवानिवृत्त) आणि महालक्ष्मी प्रशालेतील तत्कालीन प्रयोगशाळा परिचर उमेश प्रकाश काळे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी खटल्याचा निकाल जाहीर केला.

आणखी वाचा-सोलापूर : मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेना म्हणून पित्याची आत्महत्या

या खटल्यातील लाच लुचपतीची कारवाई २०१६ साली म्हणजे आठ वर्षापूर्वी झाली होती. संबंधित तक्रारदार एका शाळेत शिपाईपदावर कार्यरत असताना एका प्रकरणात दोषी ठरवून त्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. न्यायालयीन लढाईनंतर त्यास पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. बडतर्फीच्या काळातील त्याच्या थकीत वेतनासह अन्य देय रकमा मिळण्यासाठी त्याने वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार देय रकमा मंजूर करून अदा करण्यासाठी तेथील वरिष्ठ लिपीक संतोष ठाकूर याने लाच मागितली. ही लाच दुसरा आरोपी उमेश काळे याच्या मदतीने घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. दत्त्तूसिंग पवार यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून दोन्ही आरोपींना शिक्षा व दंड ठोठावला.