लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ४० मतदान केंद्रांकडे निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. शहरात ३२, तर ग्रामीण भागात ८ मतदान केंद्र संवेदनशील सदरातील आहेत.
ज्या मतदान केंद्रातील मतदारांकडे ओळख प्रमाणपत्रांची संख्या कमी आहे. स्थलांतरित लोकसंख्या अधिक आहे. असे मतदान केंद्र निवडण्यात आले. जिल्ह्य़ात मतदान ओळख प्रमाणपत्र कमी असणारे मतदान केंद्र तसे नाहीतच. ९६ टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. स्थलांतरित मतदारांची संख्याही कमी आहे. ज्या मतदान केंद्रावर ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाले असेल आणि त्याच मतदान केंद्रात ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान एकाच उमेदवाराला झाले असेल तर त्याचीही छाननी ‘क्रिटिकल मतदान केंद्र’ जाहीर करण्यापूर्वी करण्यात आली. जिल्ह्य़ात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांनी आढावा घेतल्यानंतर मतदान केंद्राची यादी तयार करण्यात आली. जिल्हाधिकारी विक्रम कुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी ४० मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’ असल्याचे म्हटले आहे. नव्याने ४३ मतदान केंद्रे वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्य़ात १ हजार ७१३ मतदान केंद्र झाल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. ही संख्या १० हजारांपेक्षा अधिक होते. प्रशिक्षणाला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, वर्ग-१ च्या काही अधिकाऱ्यांनी व प्राध्यापकांनी निवडणुकीत मतदान केंद्र अध्यक्ष व्हायला नकार द्यायला सुरुवात केली आहे. काही जणांनी आमच्याकडे केवळ शाई लावण्याचे काम द्या, अशीही विनंती केली. तर काही कर्मचारी शिपायाची कामे करायलाही तयार आहेत. जबाबदारी नको, असे चित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतावत असल्याने या पुढे कामचुकार अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
 निवडणुका शांततेत व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली जात आहे. जिल्ह्य़ात १ हजार ८०९ शस्त्रे ताब्यात घेण्याचा प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. शहरातील १ हजार २८६, तर ग्रामीण भागातील ५२३ शस्त्रे ताब्यात घ्यावीत की नाहीत, यासाठी लवकरच बठक होणार आहे. १५० शस्त्रे आतापर्यंत जमा करण्यात आली आहेत.