तालुक्यातील खेड येथे भिगवण भीमा नदीपात्रामधील वाळू बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन केल्याबद्दल सहा वाळूमाफियांना एकूण ३९ लाख ७५ हजार १५० रुपये दंड करण्यात आला. परीक्षाविधीन तहसीलदार लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही कारवाई केली. अवघ्या सहा दिवसांच्या वाळूउपशावर ही कारवाई करण्यात आली असून एकुणात कारवाई झाली असती तर काही कोटीत दंड वसूल झाला असता असे सांगण्यात येते.
या कारवाईत खेड येथील रामराजे मोरे, उदयसिंह मोरे, चौरंगी मोरे, चंदरराव मोरे, महेश मोरे, शकंर मोरे या राजकीय पदाधिकारी व प्रतिष्ठितांचा समावेश आहे. त्यामुळेच या कारवाईने खळबळ उडाली आहे. दि. ७ मार्चला ही कारवाई करण्यात आली, मात्र संबंधितांना अलीकडे त्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
तालुक्यात सीना, भीमा व अन्य ठिकाणांसह नदीपात्रात वाळूचे लिलाव झाले नसताना मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. मात्र या वाळूमाफियांना राजाश्रय असल्याने व काही अधिका-यांचे हात ओले केल्याने वाळूतही पाणी झिरपते. मात्र कर्जत येथे प्रभारी प्रांताधिकारी म्हणून पदभार घेतलेले परीक्षाविधीन तहसीलदार लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही धाडसाने कारवाई केली.
वरील सहा जणांना महसूल विभागाने तशी नोटीस दिली आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या सहा दिवसांच्या काळात दररोज अंदाजे १० ते १२ ब्रास उकरून ७० ते ७२ ब्रास बाळू अनधिकृत उत्खनन केली आहे. तसा अहवाल कामगार तलाठय़ाने सादर केला आहे. त्यानुसार या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर परवापर्यंत (दि. २५) लेखी म्हणणे सादर करण्यास कळवण्यात आले आहे, मात्र अद्यापि यातील एकानेही या नोटिशीला उत्तर दिले नाही. या नोटिसा आल्यानंतर संबधित वाळू माफियांनी अधिका-यास चांगलेच धारेवर धरल्याचे समजते. त्यामुळेच हा दंड वसूल होमार की नाही याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.

Story img Loader