‘सामान्य माणसाचा अधिकार’ म्हणून राबविल्या जाणाऱ्या ‘आधार कार्ड’ची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या प्रतिसादाअभावी बरीच संथ झाली असून, पालिका निवडणुकीमुळे या कामात भलताच रस घेणाऱ्या राजकीय नेत्यांनी जनजागृतीकडे पाठ फिरविल्याची ही परिणती असल्याचे मानले जात आहे. नवीन लोकसंख्येनुसार शहरात आतापर्यंत दोन्ही टप्पे मिळून ५९.१९ टक्के म्हणजे ७ लाख ७९ हजार २३ नागरिकांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे, परंतु अद्याप तब्बल पाच लाख ३७ हजार १९७ अर्थात ४० टक्के नागरिकांची नोंदणी बाकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नोंदणीचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले असले तरी त्यातील किती जणांना कार्ड मिळाले, याची माहिती खुद्द महापालिकेजवळही नाही. परिणामी, कार्ड वितरणातील गोंधळामुळे अनेकांना अद्याप त्यांचा ‘आधार’ गवसलेला नाही.
नाशिक महापालिका हद्दीत साधारणत: दीड वर्षांपूर्वी अतिशय उत्साहात सुरू झालेली आधार योजना सध्या दुसऱ्या टप्प्यातील पाच महिने लवकरच पूर्ण करणार आहे. पहिल्या टप्प्यात सात लाख २७ हजार १५१ नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती. त्यात  नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण नवीन नाशिक (सिडको), नाशिकरोड व पंचवटी प्रभागात झाले होते. त्या तुलनेत नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम हे प्रभाग पिछाडीवर पडले होते. दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला जुलै २०१२ पासून प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत म्हणजे प्रारंभीच्या चार महिन्यांत केवळ ५१ हजार ८७२ नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यात नाशिक पूर्व नेहमीप्रमाणे पिछाडीवर राहिल्याचे दिसून येते.
दुसऱ्या टप्प्यातील या मोहिमेत सध्या संपूर्ण शहराच्या ८० टक्के भागात केंद्रांची उभारणी करण्यात आल्याची माहिती या योजनेचे समन्वयक तथा कर विभागाचे उपायुक्त हरिभाऊ फडोळ व साहाय्यक अधीक्षक किशोर चव्हाण यांनी दिली. ६१ पैकी ५० प्रभागांत सध्या आधार कार्ड नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
 उर्वरित दहा प्रभागांत ती लवकरच सुरू केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अतिशय कमी नोंदणी झालेल्या नाशिक पूर्व प्रभागात नुकतीच दुसऱ्या टप्प्यात ही प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्यांपैकी किती जणांना कार्ड मिळाले याची महापालिकेकडे माहिती नाही. कार्ड विलंबाने मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी कार्ड वितरणाचे संपूर्ण काम देशात केवळ एकाच ठिकाणी म्हणजे बेंगलुरू येथे होत असल्याचे सांगितले. तेथे कामाचा प्रचंड व्याप असल्याने बहुधा हा विलंब झाला असेल. मात्र आता पोस्टामार्फत वितरण प्रक्रिया सुरळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्याचे काम मार्च २०१३ पर्यंत चालणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा