सांगली : विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात 40 विधवा महिलांचा खणा-नारळाने ओटी भरून हळदी कुंकूवाचा सन्मान देण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या 200 महिलांनी यापुढे विधवा शब्द न वापरता सक्षम महिला असा शब्द वापरण्याची सामुहिक शपथ घेतली. यामुळे विधवांची ओटी भरणारे आणि हळदी कुंकवाचा मान परत देणारे शेटफळे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”, मनोहर जोशींचे नाव घेत शिंदे गटातील आमदाराचे गंभीर आरोप
विधवा प्रथा बंदीचा ठराव झालेल असला तरी त्याची प्रत्यक्षात सामुहिक अंमलबजावणी करण्यासाठी विधवा महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लतादेवी बोराडे यांनी पुढाकार घेतला. आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असलेल्या गदिमांचे बालपण गेलेल्या शेटफळे या गावात त्यांनी यासाठी बैठका घेउन प्रबोधन करीत सामुहिक कार्यक्रमात विधवा महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस शिक्षिका यांची मदत घेउन घरोघरी जाउन प्रबोधन केले.
हेही वाचा >>> राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली? नेमकं कारण आलं समोर
श्रीमती बोराडे, सुवर्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग. दि. माडगूळकर स्मारकामध्ये विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरून हळदी-कुंकू लावून सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सुप्रिया गायकवाड, उपसरपंच विजय देवकर उपस्थित होते. एस.एस.गायकवाड आणि प्रा.सी.पी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.या सन्मान सोहळ्यास उपस्थित असलेल्या गावातील दोनशे महिलांनी विधवा शब्दाचा वापर न करता सक्षम महिला असा करण्याची शपथ यावेळी घेतली.