शहराला आधीच आठ दिवसांतून एकदा होणारा पाणीपुरवठा, त्यात उद्योगांनाही पाणीटंचाईची मोठी झळ बसू लागली आहे. पिण्यासाठी कसेबसे पाणी उपलब्ध केले जाते. परंतु उद्योगांसाठी पाणी खरेदी करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसल्याचे येथील सध्याचे चित्र आहे. परिणामी, दररोज तब्बल ४०० टँकर पाणी विकत घेण्याची वेळ येथील औद्योगिक वसाहतीवर आली आहे.
दुष्काळाच्या तीव्रतेमुळे सध्या पाण्याचा भाव वजनावर केला जात आहे. घाऊक खरेदी करणाऱ्या उद्योगांसाठी २० हजार लीटरला (२० टन) दीड हजार रुपये मोजावे लागतात. लगतच्या भागातून टँकरने पाणी आणावे लागते. भारनियमन झाल्यास पाणी मिळण्यास उशीर होतो. फेब्रुवारीतच पाण्याची अशी मोठी चणचण आहे. मार्च व त्यानंतरचे काय, असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एप्रिल-मेमध्ये पाण्याअभावी उद्योग बंद ठेवण्याची वेळ येणार काय, अशी साधार भीती व्यक्त केली जात आहे.
मार्चपासून शहराला १० दिवसांतून एकदा पाणी देण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केले जात आहे. या कालावधीत शहरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा पर्यायही अमलात आणावा लागणार आहे. पाणीटंचाईची मोठी झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाण्याने तळ गाठलेला असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. लातूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनाही पाण्याचा मोठा तुटवडा भासत असून, पाणीटंचाईमुळे गेल्या १५ दिवसांपासून दररोज सुमारे ४०० टँकर पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून आठ दिवसांतून एकदाच पाणी दिले जाते. परंतु आता उद्योजकांच्या पाण्यात मोठी कपात करण्यात आल्यामुळे कसेबसे पिण्यास पाणी पुरते. मात्र, उद्योग चालवण्यासाठी एमआयडीसीत पाणी उपलब्ध करून देऊ शकत नसल्यामुळे पाणी खरेदी करण्याला पर्याय नाही.
लातूरच्या एमआयडीसीत सुमारे ७० डाल मिल आहेत. प्रत्येक डाल मिलला किमान एक टँकर पाणी रोज लागते. डाळ तयार करण्यापूर्वी हरभरा, तूर यावर पाणी मारावे लागते, तरच त्याचे टरफल बाजूला निघते. तेल तयार करणाऱ्या उद्योगांनाही मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. सोयाबीन, सूर्यफूल यांच्यापासून तेल काढताना त्यावर पाणी मारावे लागते, शिवाय बॉयलरसाठीही पाणी लागतेच. छोटय़ा-मोठय़ा उद्योगांनाही कमी-अधिक प्रमाणात पाणी खरेदी करावे लागते. एमआयडीसीत दररोज सुमारे ४०० टँकर म्हणजे सुमारे २० लाख लीटर पाणी विकत घ्यावे लागत आहे.
धान्याप्रमाणे साठवण!
उन्हाळय़ात पुढील वर्षांसाठी धान्यखरेदी करण्याची पद्धत आहे. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी खरेदी करून, त्याला ऊन देऊन, नीट करून साठवणूक केली जाते. या वर्षी धान्यांबरोबरच नागरिक पाणीही साठवून ठेवण्याची शक्यता अधिक आहे. आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्यामुळे लातूरकरांना पाणी साठवून ठेवण्याची सवय आहेच. मध्यमवर्गीयांमध्ये पाण्यापासूनचे आजार उद्भवू नयेत म्हणून बाटलीबंद पाणी वापरण्याकडे कल आहे. सध्या लातूर शहरात बाटलीबंद पाणी छोटय़ा व मोठय़ा जारमध्ये रोज किमान २० लाख लीटर विकले जाते. १ लीटरच्या बाटलीचा घाऊक दर ८० रुपयास १ डझन इतका आहे. या वर्षी एप्रिलमध्ये हा भाव ११० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता गृहीत धरून छोटेमोठे विक्रेतेही पुन्हा पाण्याची अडचण होऊ नये, यासाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा करीत आहेत. उन्हाळय़ात थंड केलेले पाणी १५ रुपयांना १ लीटरची बाटली विकली जाते. या वर्षी या भावातही वाढ होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा