डीजेच्या तालावर ताल धरीत, राजकीय पुढाऱ्यांनी पुरस्कृत केलेले लाल, निळे, पिवळे टी-शर्ट घालून थरावर थर रचून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली असून, हा थरार पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा होत असून, त्यासाठी राजकीय पक्ष, तसेच मित्रमंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गोविंदा सज्ज झाले आहेत. या वर्षी जिल्ह्य़ात ४०१ सार्वजनिक, तर २८६१ खासगी दहीहंडय़ा उभारण्यात येणार असून, यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहेत राजकीय पुढाऱ्यांनी पुरस्कृत केलेल्या लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडय़ा!
कोकणात दरवर्षी दहीहंडी हा उत्सव ‘सण’ म्हणूनच साजरा करण्याची पद्धत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा सणच राजकीय पक्षांनी हायजॅक केला असून, त्याचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळींमध्येच जोरदार स्पर्धा सुरू झालेल्या दिसून येतात. परिणामी दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करण्याची शक्कल राजकीय मंडळींनी लढविली आहे. दहीहंडय़ा फोडण्यासाठी मोठय़ा बक्षिसांसह काही ठिकाणी मराठी व हिंदी चित्रपट तारकांच्या उपस्थितीने या सणाला गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. अर्थात रत्नागिरीही याला अपवाद नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमाला चित्रपट तारकांची उपस्थिती लावून गर्दी खेचण्याचा डाव राजकीय मंडळींकडून खेळला जाऊ लागला आहे.
लांजा शहरात
४,४४,४४४ रुपयांची दहीहंडी
रत्नागिरी जिल्ह्य़ात लांजा शहरात भाई विचारे मित्रमंडळाने यंदाच्या आपल्या तिसऱ्या वर्षी तब्बल ४ लाख ४४ हजार ४४४ रुपयांची दहीहंडी उभारली आहे. ९ थरांची हंडी फोडण्याचे भले मोठे आव्हान जिल्ह्य़ातील गोविंदा पथकांसमोर असून, ते कोण पेलणार, याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय महिला गोविंदा पथकांसाठी खास बक्षीस म्हणून पाचव्या थरासाठी रोख १५ हजार व सहाव्या थरासाठी रोख १८ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे, तसेच पुरुष गोविंदा पथकांसाठी पाचव्या थराला पाच हजार, सहाव्या थराला सात हजार, सातव्या थराला दहा हजार, आठव्या थराला २५ हजार, तर नवव्या थराला ४ लाख ४४ हजार ४४४ रुपयांसह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
तसेच या दहीहंडीनिमित्त भाई विचारे मित्रमंडळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित ग्रुप डान्स स्पर्धाही आयोजित केल्या असून, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी हजारो रुपयांची बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. लांजा येथील कुलकर्णी- काळे छात्रालयाच्या पटांगणावर आयोजित भाई विचारे मित्रमंडळाची ही दहीहंडी काँग्रेसचे खासदार डॉ. नीलेश राणे यांनी पुरस्कृत केली आहे.
रत्नागिरी शहरात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग तथा आबा घोसाळे, मोटार मालक-चालक संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांसह अनेक मंडळांनी दहीहंडय़ा उभारल्या असून, लाखोंची बक्षिसे जाहीर केली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ात ४०१ सार्वजनिक ,तर २८६१ खासगी दहीहंडय़ा बांधण्यात येणार असून, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कंसातील संख्या खासगी हंडय़ांची आहे. रत्नागिरी शहर- १० (९०), रत्नागिरी ग्रामीण- १२४ (१२५), जयगड- १६ (१५५), राजापूर- ३६ (६६), नाटे- ४० (८५), लांजा- ३७ (७०), देवरुख- ८ (५५), संगमेश्वर- ८ (२१०), सावर्डे- ७ (१२४), चिपळूण- १२ (१७५), अलोरे- ७ (४८), गुहागर १० (२२०), खेड २४ (४५०), दापोली ४० (३७०), मंडणगड- ६ (२२३), बाणकोट- १६ (३८७).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा