बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दरांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली असून भाषा विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नाशिकमध्ये २२, जळगाव १६ तर नंदुरबारमध्ये तीन कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. संबंधित विद्यार्थ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकूण नऊ भरारी पथके कार्यान्वित केली आहेत.
याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीही विशेष पथक कार्यान्वित असून त्यांच्यामार्फत गैरप्रकारांवर स्वतंत्रपणे लक्ष ठेवण्यात येत आहे. बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी व उर्दू या विषयांचे सकाळ व दुपारच्या सत्रात पेपर होता. या परीक्षेदरम्यान नाशिक जिल्ह्यातील नामपूरच्या केंद्रावर सर्वाधिक म्हणजे १५ कॉपीचे प्रकार उघडकीस आले. त्यानंतर ननाशी येथील परीक्षा केंद्रावर कॉपीचे सात प्रकार उघडकीस आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. जळगाव जिल्ह्यातही कॉपी बहाद्दरांनी रंग दाखविले. या जिल्ह्यात एकूण १६ कॉपीचे प्रकार भरारी पथकाने पकडले. नंदुरबार जिल्ह्यात तीन प्रकार उघडकीस आले. धुळे जिल्ह्यात मात्र कॉपीचा एकही प्रकार उघडकीस आला नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा