पारनेर तालुक्यातील लोणी मावळा, वसदरे व बाभुळवाडे या तीन ग्रामपंचायतींत मिळून सुमारे ४१ लाख २७ हजार ९०७ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून ग्रामसेवक एम. बी. गायकवाड याला निलंबित करण्यात आले आहे. गायकवाडविरुद्ध गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे. या गैरव्यवहारात या तिन्ही गावच्या सरपंचांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे कारवाई प्रस्तावित केली जाईल.
पारनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत २२ डिसेंबर २०११ ते १३ फेब्रुवारी २०१४ या सुमारे सव्वादोन वर्षांत ग्रामसेवक गायकवाड याने विविध विकासकामांसाठी उपलब्ध केलेली रक्कम हडप केल्याचे निष्पन्न झाले. गायकवाडच्या कायमस्वरूपी अपहाराची रक्कम १३ लाख ४१ हजार ९५७ रुपये तर संशयित अपहाराची रक्कम २७ लाख ८५ हजार ९५० रुपये आहे.
लोणी मावळा, वसदरे व बाभुळवाडे या तिन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकपदाची सूत्रे गायकवाडकडे होती. मूल्यांकन न करता खर्च करणे, १३व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणारे रस्ते, रंगकाम, पाणीपुरवठा योजनांची कामे, प्राथमिक शाळांचे कंपाऊंड, हरियाली योजना, व्हिडिओ शूटिंग आदी कामांत गैरव्यवहार केल्याचे आढळले. अनेक कामांचा निधी त्याने परस्पर खर्च केला, त्यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेतली नाही, दरपत्रकाप्रमाणे खरेदी केलेली नाही.
या गैरव्यवहारात तिन्ही गावांच्या सरपंचांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. बाभुळवाडेच्या सरपंचांना ७ प्रकरणात तर लोणी मावळा व वसदरेच्या सरपंचांना प्रत्येकी एका प्रकरणात जबाबदार धरण्यात आले आहे. याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. गायकवाडला निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. याशिवाय गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. तिन्ही सरपंचांवर स्वतंत्रपणे कारवाई केली जाईल.