सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात या लोकसभा निवडणुकीत नव्याने ४१ हजार ६८३ मतदारांत वाढ झाली आहे. त्यात नवोदित मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा रोष कोणाला पत्करावा लागेल याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. २३ एप्रिल २००९ ला झालेल्या मागील लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गात पाच लाख ८९ हजार २६४ मतदार होते. १७ एप्रिल २०१४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सहा लाख ३० हजार ६८३ मतदार आहेत. लोकसभा निवडणूक पाश्र्वभूमीवर ९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्य़ात एकाच दिवशी ४८०१ नव्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यात नवीन मतदार जास्त प्रमाणात आहेत. या लोकसभा निवडणुकीत नकाराधिकार वापरण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. त्याचा वापर बऱ्याच प्रमाणात होण्याची शक्यता आहे. शासकीय यंत्रणा मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारराजाला मतदानासाठी जागृत करणार आहे, तसा संकल्प निवडणूक विभागाचा आहे. लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या आंबा, काजूचा हंगाम आहे. शिवाय शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मतदारांना जागृत करण्यासाठी राजकीय लोकांना चांगली संधी मिळाली आहे. मंगलकार्य, धार्मिक कार्याच्या ठिकाणी मतदारांना आश्वासने, अभिलाषा दाखविण्यावरही निवडणूक विभागाचे लक्ष आहे. या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार झाल्यास तो खर्चही संबंधित उमेदवाराच्या खर्चात दाखविण्याची तयारी निवडणूक विभागाची आहे. होळी सणाला निवडणुकीच्या निमित्ताने गोवा बनावटी दारूचा महापूर येणार आहे. पोलिसांच्या नाकाबंदी व चेक पोस्ट तपासणीवर दारू धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या गाडय़ा सोडल्या जात असल्याने ती एक राजकीय चर्चा आहे. मद्याला सूट पोलिसांनी दिल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा