कोयना धरणाचा पाणीसाठा व धरण क्षेत्रासह त्याखालील कृष्णा, कोयनाकाठच्या पावसाची सद्य:स्थिती गेल्या पाच वर्षांतील विक्रमी असून, जल व ऊर्जा स्तोत्रांमध्ये महाराष्ट्राचे आधारवड ठरलेले १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरण दोन तृतीयांशहून ज्यादा भरले आहे. गतवर्षी या उलट एक तृतीयांशहून पाणीसाठा राहताना, दोन तृतीयांश धरण रिते होते. महाकाय कोयना धरणाचा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सव्वा दोनपट ज्यादा असून, तितकाच समाधानकारक पाऊसही कोसळल्याची आकडेवारी आहे.
यंदा चालू हंगामातील ३५ दिवसात धरणात सुमारे ४२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद १५ हजार ५०० क्युसेक्स पाणी मिसळत आहे. धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी सुमारे दुप्पट पाऊस झाला आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस- सातारा १२.२(३२५.३), जावली १३.७(६६७.८), कोरेगाव ०.९(१७०.९), फलटण शुन्य (१०९.३), माण ०.१ (७७.७), खटाव ०.२(१२२.५), वाई ४.५(३३३.६), महाबळेश्वर ३४.८ (८८३.६) तर खंडाळा तालुक्यात ५.२ एकूण १९८.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी जवळपास ७१ टीएमसी म्हणजेच ६७.५ टक्के असून, गतवर्षी आजमितीला हाच पाणीसाठा ३२.८४ टीएमसी म्हणजेच ३१.२० टक्के असा अतिशय चिंताजनक होता. धरणक्षेत्रात गतवर्षी आजमितीला सरासरी १,०५४ मि. मी., पावसाची नोंद होती. यंदा हाच पाऊस २२८५.२५ मि. मी. झाला आहे. धरणाखालील कराड तालुक्यात गतवर्षी आजअखेर कराड तालुक्यात १२०.५१ मि. मी. पाऊस झाला होता. सध्या सरासरी १८९.८१ मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे.
पाटण तालुक्यात सध्या ६८१.७५ मि. मी. पावसाची नोंद असून, गतवर्षी हाच सरासरी पाऊस ४१५.८८ मि. मी. नोंदला गेला आहे. यंदा कोयना धरणक्षेत्रातील प्रतापगड विभागात सर्वाधिक २४४९ मि. मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी नवजा विभागात आजअखेर सर्वाधिक १,२२० मि. मी. पावसाची नोंद झाली होती. चालू हंगामात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २,१०५ मि. मी., नवजा विभागात २,४१६, महाबळेश्वर विभागात २,१७१ पाऊस नोंदला गेला आहे. गतवर्षी महाबळेश्वर विभागात ९५१ तर, कोयनानगर विभागात ९९१ मि. मी. पावसाची नोंद झाली होती.
आज सकाळी ८ ते ६ या दहा तासात कोयना धरणक्षेत्रात सरासरी ५३.५ मि. मी.पाऊस कोसळला आहे. तर, आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पाटण तालुक्यात १०.१० तर कराड तालुक्यात २.८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार तर, कराड व पाटण तालुक्यात पावसाची रिपरिप राहिल्याचे वृत्त आहे. समाधानकारक पावसामुळे खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून, काही ठिकाणी सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. विक्रमी पावसामुळे कोयना धरण तुलनेत अगदीच लवकर भरण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी ४ सप्टेंबरला कोयना धरण क्षमतेने भरल्याने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटाने उचलून कोयना नदी पात्रात ९ हजार ४८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. यंदामात्र प्राप्त परिस्थिती पहाता गतवर्षीच्या तुलनेत किमान महिनाभर अगोदर म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातच कोयना जलाशय शिगोशिग भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच कोयनेच्या दुसऱ्या आणि ऐतिहासिक लेक टॅपिंगच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रासह शेजारच्या चार राज्यांना विजेचा लखलखाट देणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती अखंड आणि पूर्ण क्षमतेने कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा