चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील एक हजार मेगावॉट क्षमतेच्या नव्या वीज प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ‘भेल’ व ‘बीजीआर’ या दोन कंपन्यांना महाजनकोने ४२० कोटीचा दंड ठोठावला असून २०१३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा आदेश या कंपन्यांना देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ऊर्जामंत्री असताना त्यांनी डिसेंबर २०१२ पर्यंत संपूर्ण राज्य भारनियमन मुक्त होईल, अशी घोषणा केली होती. ही घोषणा नव्याने होणाऱ्या वीज प्रकल्पातून मिळणारी वीज गृहीत धरून करण्यात आली होती. यात येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात उभारण्यात येणाऱ्या एक हजार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचा सुद्धा समावेश होता. २००९ च्या जुलैमध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम गेल्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते. आता सप्टेंबर जाऊन नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी या प्रकल्पाचे काम अजूनही ६० टक्क्याच्या वर सरकलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या महाजनकोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या भेल व बीजीआर या कंपन्यांना हा दंड ठोठावला आहे. हा संपूर्ण प्रकल्प ५ हजार ५०० कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. प्रकल्पाच्या उभारणीचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. यापैकी भेल या कंपनीला २६०० कोटी तर दक्षिण भारतातील बीजेआर या कंपनीला १६०० कोटीचे कंत्राट देण्यात आले आहे. भेलकडे वीज निर्मिती संच उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बीजेआरकडे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भेल कंपनीने २००९ च्या फेब्रुवारीमध्ये कामाला सुरूवात केली तर बीजेआरने याच वर्षी जुलैमध्ये काम सुरू केले. या दोन्ही कंपन्यांनी महाजनकोसोबत केलेल्या करारानुसार गेल्या सप्टेंबर महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते सुरूच न झाल्याने आता महाजनकोने भेल कंपनीला २६० कोटी तर बीजीआरला १६० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. महाजनकोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांसोबत करण्यात आलेल्या करारातच दंडाची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार एकूण कंत्राटाच्या १० टक्के रक्कम या कंपन्यांकडून दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी दंड आकारला जाऊ नये म्हणून महाजनकोवर उच्चस्तरावरून दबाव आणला पण अधिकारी बधले नाहीत, अशीही माहिती मिळाली आहे. या दोन्ही कंपन्यांकडून दंडाची रक्कम वसूल करणे सुरू झाले आहे अशी माहिती महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता या दोन्ही कंपन्यांना २०१३ च्या सप्टेंबपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करा असे बजावण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची गती बघता पुढील वर्षी सप्टेंबपर्यंत हे काम पूर्ण होईल की नाही, याविषयी महाजनकोचेच अधिकारी साशंक आहेत.