खाणी, कारखाने कारणीभूत
प्रदूषणामुळे जिल्ह्य़ात विविध आजारांची लागण झाली असून, २०१० ते २०१५ या पाच वर्षांंत ४३३ लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याची धक्कादायक माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे चंद्रपुरातील जल, वायू व ध्वनी प्रदूषण जीवघेणे ठरले आहे.
औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या या जिल्ह्य़ात वेकोलिच्या ३० वर कोळसा खाणी, पेपर मिल, पाच सिमेंट कारखाने, पोलाद उद्योग, वीज केंद्र, कोल वॉशरी तसेच इतर छोटे मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमुळे जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहिती अधिकारात प्रदूषणामुळे गेल्या पाच वर्षांत किती लोकांना प्राण गमवावे लागले, याची माहिती घेतली असता तब्बल ४३३ लोकांचा मृत्यूचे कारण प्रदूषण ठरल्याचे समोर आले. ही आकडेवारी निश्चितच धक्कादायक आहे. प्रदूषणामुळे या जिल्ह्य़ातील लोकांना दमा, ह्रदयविकार, एसीडीटी, त्वचारोग, क्षयरोग, कर्करोग आदी विविध आजारांनी ग्रासले आहे. कर्करोग तर या जिल्ह्य़ात झपाटय़ाने पसरत आहे. हे सर्व आजार प्रदूषणामुळे बळावले असल्याची नोंद जिल्हा रुग्णालयाने घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१०-११ या वर्षी ७७ लोकांचा मृत्यू झाला, तर २०११-१२ मध्ये ६६, २०१२-१३ मध्ये ५९, २०१३-१४ मध्ये ९०, २०१३-१४ मध्ये ५६ व २०१४-१५ मध्ये ८५ लोकांचा मृत्यू झालेला आहे.
चंद्रपूर जिल्हय़ातील पाणी सर्वाधिक प्रदूषित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे घरातील नळांनाही सर्रास दूषित पाणी येते. त्यामुळेच कावीळ, ताप, पोटाचा कर्करोग, किडनी आदि विविध आजार होतात. या शहरात दम्याचे १७ हजार रुग्ण आहेत. गेल्या पाच वर्षांंचा विचार केला तर दम्याच्या रुग्णांची संख्या ८८ हजार ५६३ च्या घरात आहे. त्वचारोग रुग्णांची संख्या २५ हजार आहे. चंद्रपूर, घुग्घुस आणि बल्लारपूर ही शहरे प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. याच वर्षी प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र, त्याचा फायदा झालेला दिसत नाही. विशेष म्हणजे, ही आकडेवारी केवळ जिल्हा रुग्णालयातील आहे. शहरातील ७५ वर खासगी रुग्णालयातील आकडेवारी बघितली तर धक्कादायक सत्य समोर येईल, असेही बेले म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा