अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या निर्णयाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचा आहे. सगळेच ५३ आमदार आमच्याकडं होते. त्यातील ९ जणांवर कारवाई केली आहे. ५३ पैकी ९ सोडून बाकीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. त्यामुळे आमदारांना संकटात टाकू नये. त्यांना प्रलोभने दाखवून दबाव टाकू नये. सर्वांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करून द्यावे, असं आवाहन करतो.”
हेही वाचा : प्रफुल्ल पटेलांकडून प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
न्यायालयात जाणार का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “न्यायालयात जाण्याची गरज नाही. आमचा पक्ष व्यवस्थित चालला आहे. महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे आमच्यापाठीमागे असेल, तर कोणत्याही भीतीचं कारण नाही.”
हेही वाचा : शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रेबाबत कधीपर्यंत निर्णय घेणार? राहुल नार्वेकर म्हणाले…
“कुणी काही म्हणो मीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. शरद पवार जोपर्यंत बाजूला हो म्हणत नाहीत. तोपर्यंत बाजूला करण्याचा कुणाला अधिकार नाही,” असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.