महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सहाव्या वर्षांतील जिल्हा मूल्यमापनास लवकरच सुरुवात होत आहे. त्या अंतर्गत नाशिक परिक्षेत्रातील ४४५७ गावांचे मूल्यमापन करण्यात येईल. यानंतर जिल्हा बाहय़ मूल्यमापनाचा टप्पा असेल.
मोहिमेत सहभागी झालेल्या गावांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी पाचसदस्यीय स्वतंत्र जिल्हा समिती दरवर्षी १५ एप्रिलपूर्वी स्थापन केली जाते. तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम साधारणत: पावणे दोन महिन्यांचा असून या काळात विहित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन शासन स्तरावरून तंटामुक्त गावांची घोषणा करण्यात येते. १ मे रोजी ज्या गावांनी ग्रामसभा घेऊन गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर केले असेल आणि अध्यक्ष व निमंत्रकांच्या स्वाक्षरीने स्वयंमूल्यमापन अहवाल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे २ मेपूर्वी पाठविला असेल, अशा गावांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनाच्या कार्यक्रमानुसार १५ एप्रिलपूर्वी जिल्हा मूल्यमापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ५ मेपूर्वी जिल्हा मूल्यमापन समित्यांना तालुक्यांचे वाटप करण्यात येईल. ५ मे ते ५ जून या कालावधीत जिल्हा मूल्यमापन समित्यांमार्फत नाशिकमधील ९३९, धुळे ५५१, जळगाव ११५१, नंदुरबार ५०१ व अहमदनगर १२९५ गावाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला जाईल. जिल्हा बाह्य मूल्यमापनासाठी १५ जूनपूर्वी जिल्ह्यांचे वाटप झाल्यावर पुढील महिनाभराचा कालावधी जिल्हा बाह्य मूल्यमापनासाठी राखून ठेवण्यात आला आहे. २० जुलैपूर्वी जिल्हा बाह्य मूल्यमापन समिती त्यांचा अहवाल सादर करणार आहे. शासनाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

Story img Loader