दुप्पट पैशाचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केलेल्या उल्हास खरे याने रत्नागिरीतील विविध बँकांमध्ये काढलेली ४५ खाती पोलिसांनी गोठवली आहेत.
देशभरातील दोन लाखांपेक्षा जास्त ग्राहकांकडून सुमारे ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुबाडल्याच्या संशयावरून गेल्या ७ नोव्हेंबर रोजी उल्हास खरे व त्याची पत्नी साक्षी यांना दिल्लीच्या पोलिसांनी येथे अटक केली आणि पुढील तपासासाठी दिल्लीत नेले आहे.
मूळचा नागपूरचा असलेला खरे सुमारे दोन वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये आला. येथील उद्यमनगर भागात नाव बदलून भाडय़ाच्या बंगल्यामध्ये हे दाम्पत्य राहात होते. त्याचप्रमाणे मारुती मंदिर परिसरात कार्यालय उघडून अशाच प्रकारे गुंतवणूकदारांची लुबाडणूक करण्याचा त्यांचा सिलसिला सुरू होता. त्यामुळे कालपासून खरे याला दिल्लीच्या पोलिसांनी येथे आणून पुढील तपास चालू केला आहे. त्यामध्ये त्याने येथील विविध बँकांमध्ये ४५ खाती स्वत: आणि पत्नीच्या नावाने काढल्याचे निष्पन्न झाले असून ही सर्व खाती पोलिसांनी गोठवली आहेत. मात्र त्यापैकी कोणत्याही खात्यावर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम नसल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्यतिरिक्त सोमवारी दिवसभर पोलिसांनी त्याचा बंगला आणि कार्यालयाची झडती घेण्याचे काम केले, मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे आणखी काही दिवस येथील तपास चालू राहील, असा अंदाज आहे.
दरम्यान, दिल्लीच्या न्यायालयाने येत्या २१ नोव्हेंबपर्यंत खरे दाम्पत्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तोपर्यंत या प्रकरणी जास्तीत जास्त पुराव्यासह माहिती गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. रत्नागिरीतील अनेक मान्यवरांनाही खरेने गंडा घातल्याचा संशय असून त्याबाबतही येथील मुक्कामात पोलीस शोध घेणार आहेत.    

१८ लाखांचे घडय़ाळ व १२ लाख रुपयांचा हॅण्डसेट
आतापर्यंतच्या तपासात खरे दाम्पत्याला आलिशान राहणीचा शौक असल्याचे स्पष्ट झाले असून, दिल्लीप्रमाणेच येथील बंगल्यातही तीन महागडय़ा गाडय़ा आणि दुचाकी पोलिसांना मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे सुमारे १८ लाख रुपये किमतीचे परदेशी बनावटीचे घडय़ाळ आणि १२ लाख रुपये किमतीचा मोबाइल हॅण्डसेट सोमवारी त्याच्याकडील तपासात पोलिसांनी हस्तगत केल्याचे समजते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 bank account sealed of khare