देशातील शहरी भागांतल्या दर दोन तरुणांपैकी एकाला एकाकीपणा जाणवतो.. हा निष्कर्श आहे कॅडबरी कंपनीने केलेल्या ‘कॅडबरी सेलिब्रेशन्स कनेक्ट सव्‍‌र्हे’चा!
या उपक्रमातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीवरून संज्ञापनाची आधुनिक साधने उपलब्ध असतानाही कामाचा अतिरिक्त ताण, चुकीची जीवनशैली आणि कुटुंबसंस्थेतील बदल यामुळे नातेसंबंधांवर विपरित परिणाम होत असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
या सर्वेक्षणानुसार ४६ टक्के तरुणांना जीवनात एकाकीपणा जाणवतो. ६६ टक्के जणांना सतत एकटे-एकटे आणि उदासवाणे वाटत राहते. ७७ टक्के लोकांना आपली सुख-दु:खे व्यक्त करण्यासाठी कोणीही नाही. तर प्रत्येक दोघांपैकी एकाची भावना व्यक्त करताना कुचंबणा होते. दिवाळीचेही तरुणांना फारसे अप्रूप उरले नसल्याचे या सर्वेक्षणात दिसले. ५१ टक्के तरुणांना दिवाळी आणि एखादी सामान्य सुट्टी या दोन गोष्टींमध्ये काहीही फरक वाटत नाही. कॅडबरीने दिवाळीच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या नातेसंबंधांबाबतच्या भावना आणि उत्सव साजरे करण्याची मानसिकता जाणून घेण्यासाठी नुकतेच हे सर्वेक्षण केले आहे. या उपक्रमात मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंडीगढ या शहरांतील एकूण २१३४ तरुणांची मते जाणून घेतली गेली. २५ वर्षे ते ३५ वर्षे हा या सर्वेक्षणासाठीचा वयोगट होता. ‘आपले’ म्हणता येईल असे कुणीतरी असावे याबाबत तरुणांना काय वाटते; मित्र, सहकारी कर्मचारी आणि कुटुंबातील परस्परसंबंधांत कसे बदल झाले आहेत; सण-समारंभ साजरे करण्याबाबत तरुणांचा उत्साह कितपत आहे..याची उत्तरे शोधणारे प्रश्न या सर्वेक्षणात विचारले गेले होते.कामाचा अतिरिक्त ताण हे तरुणांच्या एकाकीपणाचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे या सर्वेक्षणात घेतल्या गेलेल्या तरुणांच्या मुलाखतींवरून दिसते आहे. विशेषत: पुण्यासारख्या तुलनेने लहान असणाऱ्या शहरांमधील तरुणांनी आपल्याला वाजवीपेक्षा जास्त काम करावे लागत असल्याचे सांगितले आहे. सततच्या वाढत्या स्पर्धेमुळे आपल्याला अतिरिक्त काम करावेच लागते, असे तरुणांचे म्हणणे आहे. ५० टक्के तरुणांनी तर रात्री कामावरून घरी गेल्यावर थकव्यामुळे कोणाशी साधे बोलावेसेही वाटत नसल्याचे म्हटले आहे. या सर्व समस्यांमुळे दिवाळीसारख्या सणांची अपूर्वाई तरुणांना नाही. ४४ टक्के जणांना आपल्या आप्तेष्टांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यास वेळ मिळत नाही. ज्या लोकांना दिवाळीतही कामावर जावे लागते, त्यांच्यापैकी केवळ ४३ टक्केच लोक सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करतात.

Story img Loader