दापोली : फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तब्बल ४८ हजार ७०१ इतक्या मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी कांदळवन विभागाने संरक्षित केली आहेत. हे वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकणचे मोठे यश म्हणावे लागेल.

रत्नागिरीच्या किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी अन् उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवाची वीण होते. या कासवांची आणि त्यांच्या अंड्यांची हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही वर्षांपूर्वी होत असे. कांदळवन विभागाने कासव मित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे काम हाती घेतले. ते काम सध्या गतीने सुरू आहे. त्यामुळेच वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या वतीने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर रत्नागिरी ते मंडणगड वेळास दरम्यान उभारलेल्या ४४८ घरट्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ४८ हजार ७०१ इतकी अंडी संरक्षित करण्यात कांदळवन विभागाला यश आले आहे.

Story img Loader