अलिबाग – मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथे भूमिपूजन गुरुवारी पार पडणार आहे. केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत खारपाडा येथे हा सोहळा पार पडणार आहे. चौथ्या भूमिपूजन सोहळ्यानंतर तरी महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा कोकणवासियांना असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर कामाला २०११ मध्ये सुरवात झाली. त्यानंतर इंदापूर ते झाराप या टप्प्यातील काम २०१४ साली मंजूर करण्यात आले. मात्र २०२३ उजाडले तरी रस्त्याचे काम मार्गी लागू शकलेले नाही. जे काम झाले त्याच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे पळस्पे ते इंदापूर मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कासू ते इंदापूर मार्गाच्या क्राँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला होता. मात्र वर्ष सरायला आले तरी प्रत्यक्ष कामाला सुरवात होऊ शकले नाही. आता पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन समारंभ गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता खारपाडा येथे पार पडणार आहे. नितीन गडकरी स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. एकाच रस्त्याच्या कामासाठी हे चौथे भूमिपूजन असणार आहे. यावेळी तरी हे काम मार्गी लागेल, अशी आशा कोकणवासींना असणार आहे.

हेही वाचा – गिरीश बापट यांचं निधन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वाहिली आदरांजली!

४२ किलोमीटर लांबीच्या या कामासाठी २५१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय राजेवाडी ते वरंध आणि वरंध ते पुणे जिल्हा हद्द या रस्त्यांच्या कामाचे दुपदरीकरण आणि काँक्रिटीकरण कामालाही सुरवात होणार आहे. यासाठी अनुक्रमे १२६ आणि ३६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील यावेळी उपस्थित असणार आहे. एकाच रस्त्याचे चौथ्यांदा भूमिपूजन होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

१. पळस्पे ते इंदापूर पहिले भूमिपूजन २०११

२. इंदापूर ते झाराप दुसरे भूमिपूजन २०१४

३. कासू ते इंदापूर तिसरे भूमिपूजन २०२२

४. पळस्पे ते कासू चौथे भूमिपूजन २०२३


काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूली नको…

हेही वाचा – उजव्यांमधला डावा…

या मार्गावरील खारपाडा येथील टोलवसूली गुरुवार पासून सुरु होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पुर्ण झाली आहे. मात्र जोवर महमार्गाचे काम पुर्ण होत नाही तोवर कुठल्याही प्रकरची टोलवसूली करू नये अशी मागणी आम आदमी पार्टीचे अलिबाग तालुका अध्यक्ष अजय उपाध्ये यांनी केली आहे. रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आधी रस्ता करा मगच टोल घ्या असे लेखी निवेदन त्यांनी दिले आहे.