नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व खासदार विलास मुत्तेमवार यांचे प्रचार कार्यालय समजून त्यांच्या चिरंजीवाच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शुक्रवारी अचानक छापा टाकला. त्यात पाच लाख ७० हजार रुपयांची रोकड सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुत्तेमवारांचे येथील ग्रेट नाग मार्गावर वृत्तपत्र कार्यालय होते. मात्र, आता त्या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांचे ‘व्हीआरएस इन्फ्रास्ट्रक्चर्स’ हे कार्यालय असून मागे छापखाना आहे. या छापखान्यामागे पैसे वाटप सुरू असल्याची माहिती आयोगाला मिळाली. शुक्रवारी सकाळी पथकाने  कार्यालयाची झडती घेतली. त्यात पाच लाख ७० हजार रुपयांची रोकड सापडली. यावेळी स्वत: मुत्तेमवार व त्यांचे गीतेश व विशाल हे दोन्ही चिरंजीव उपस्थित होते. मुत्तेमवार यांनी कार्यालयाची तपासणी करण्यास भरारी पथकाला मज्जाव केला. सहायक निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी मुत्तेमवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर झडती सुरू झाली. त्यात वरील प्रमाणे रोकड सापडली.
दरम्यान, काँग्रेसकडून निवडणुकीच्या तोंडावर पैसे, कपडे, लुगडी वगैरे वगैरे यांचे वाटप केले जाईल. पैसे घ्या, मते मात्र कमळालाच द्या, असे आवाहन भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केले.

Story img Loader