सोलापूर : सोलापूर आणि पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पिण्याचे पाण्याचे दुसरे आवर्तन सोमवारी सकाळी सोडण्यात आले. यातून सुमारे साडेपाच टीएमसी एवढे पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी १६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी त्यात वाढ करून तो २९०० क्युसेक एवढा होता.
यापूर्वी उजनी धरणातून शेती सिंचनासाठी गेल्या २५ डिसेंबरपासून कालवा आणि बोगद्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. हे पाणी सोडण्यापूर्वी धरणातील पाणीसाठा ११८.९० टीएमसी इतका होता. आज सोमवारअखेर धरणात एकूण पाणीसाठा ९७.८७ टीएमसी आहे. यात उपयुक्त पाणीसाठा ३४.२२ टीएमसी (६३.८७ टक्के) एवढा आहे. ५२ दिवसांत सुमारे ३९ टक्के पाणीसाठा संपला आहे. सोलापूर व पंढरपूरसह मंगळवेढा आणि सांगोला तसेच भीमा नदी काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण १२ टीएमसी पाण्याची दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. पहिले आवर्तन ५.५० टीएमसी एवढे आहे.