गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने सर्वस्व गमावून बसलेल्या शेतकऱ्यांचे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सटाणा तालुक्यात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली. अवकाळी पावसाचे आतापर्यंत पाच बळी गेले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपीट व अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा अशी सर्वच पिके भुईसपाट झाली आहेत. नैसर्गिक आपत्तीने एका झटक्यात सारे काही हिरावून नेले. सर्व उत्पन्न हातातून गेले असताना दुसरीकडे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर आहे. या कर्जाची परतफेड कशी करणार या विवंचनेतून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे लक्षात येते. रविवारी सटाणा तालुक्यातील दरेगाव येथील आत्माराम पवार यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी याच भागातील बिलपुरी येथील बापू पवार या शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली. पवार यांची साडेसात एकर डाळिंबाची शेती होती. गारपिटीत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. साडेचार लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून ते आत्महत्येच्या निर्णयाप्रत आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वी धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील सतीश पाटील या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. तर नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या करंजगाव येथे माधवराव कोंडाजी गोरडे या शेतकऱ्याचा द्राक्ष बागेतील नुकसान पाहून हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तसेच गारपिटीत सापडून सिन्नर तालुक्यातील निवृत्ती आबाजी हांडोरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.