शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसला दुधाच्या टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, तर १० जण किरकोळ व गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) येथे घडली. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष व सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. अपघातानंतर टँकरचालकाने पोबारा केला आहे.
शंकरलाल उगरालाल चौधरी (वय ५५), सीता शंकरलाल चौधरी (वय ५०), दीपिका प्रकाशचंद्र शर्मा (वय ७), संपतीबाई अमरचंद जहांगीड (वय ४५), मायादेवी प्रकाशचंद्र शर्मा (वय ३५) हे पाच जण जागीच ठार झाले. तर गीताबाई दशरथ शर्मा (वय ५०), दशरथ सीताराम शर्मा (वय ६४), पवन दशरथ शर्मा (वय २५), प्रकाशचंद्र बाबुलाल शर्मा (वय ३५), अमरचंद्र बपुतराव जहांगीड (वय ५२), विनोद गोपालजी ओझा (वय ९), पूजा गोपालचंद ओझा (वय १७) या जखमींना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर मंजूदेवी सुरेशजी उपाध्याय (५२), कमला तेजपाल उपाध्याय (५४) या दोन महिलांवर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बसमधील मृत व जखमी इचलकरंजीचे रहिवासी असून, मूळचे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहेत. ते बालाजीचे दर्शन घेऊन तिरुपती येथून रेल्वेने कोल्हापूरला आले होते. तेथून ते इचलकरंजी येथील नातेवाइकांकडे गेले. इचलकरंजी येथून रात्री २ वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण मिनी बसने शिर्डीकडे निघाले असताना आज पहाटे काळाने त्यांच्यावर घाला घातला. महामार्गावरील बेलवडे हवेली येथे ही बस काही काळासाठी थांबवली होती. या वेळी काही जण बसमूधन खाली उतरले होते. तर काही साखरझोपेत होते. याच वेळी कर्नाटकहून पुण्याकडे चाललेल्या दुधाच्या टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि सुसाट टँकर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडकून सुमारे ७० ते ८० फूट पुढे जात उलटला.
अपघातावेळी मोठा आवाज झाला तरी थंडी आणि अंधार यामुळे ही घटना कळण्यास उशीर झाला. अपघातस्थळापासून बेलवडे व तळबीड ही गावे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असल्याने स्थानिक ग्रामस्थांनाही तेथे पोहोचण्यास वेळ लागला. महामार्गावरील प्रवाशांनी जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढले. तळबीड पोलीसही काही मिनिटांत दाखल झाले. मदतीचा ओघ वाढला. जखमींना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अपघाताची भीषणता गांभीर्याने घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख, कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह उंब्रज पोलीसही घटनास्थळाकडे धावले. अपघातातील टँकरमधून महामार्गावर दूध वाहू लागल्याने त्यातून दुसरा अपघात होऊ नये याचीही खबरदारी पोलिसांना घ्यावी लागली. पहाटेपासूनच येथील वाहतूक वाहगाव ते तासवडे दरम्यान, सेवा रस्त्यावरून सुरू ठेवण्यात आली. पाणीबंब मागवून बसमधून सांडलेले डिझेल, रक्ताचा सडा व टँकरमधील वाहते दूध साफ करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. अपघाताची फिर्याद बसचे चालक रमेश मल्लाप्पा माळी (रा. इचलकरंजी) यांनी तळबीड पोलिसात दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम करीत आहेत. पोबारा करणारा टँकरचालक धर्मराज (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसला टँकर धडकून ५ ठार, १० जखमी
शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसला दुधाच्या टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, तर १० जण किरकोळ व गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) येथे घडली.
First published on: 07-12-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 killed 10 injured in bus and tanker accident