पुणे शिक्षण संचालकांनी जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या माहितीनुसार राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची ५ हजार ५५६ पदे रिक्त आहेत आणि ४ हजार २२८ शिक्षक अतिरिक्त आहे. सध्या रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले तरी शिक्षकांची १ हजार ३२८ पदे रिक्त राहणार आहेत, त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा अनुशेष कायमच राहण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबईसह ३३ जिल्ह्य़ांची ऑनलाइन संच मान्यता पूर्ण करून ती शिक्षण संचालकांना सादर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती व अतिरिक्त शिक्षकांची माहिती ऑनलाइन जाहीर करण्यात आली. ३३ जिल्ह्य़ांमध्ये एकूण ५ हजार ५५६ पदे रिक्त, तर संच मान्यतेनुसार राज्यात ४ हजार २२८ शिक्षक अतिरिक्त आहेत. पश्चिम मुंबईत सर्वाधिक ४१८ तर, सर्वात कमी जालना जिल्ह्य़ात १५ शिक्षक अतिरिक्त आहेत. सांगली जिल्ह्य़ात एकही अतिरिक्त शिक्षक नाही. रिक्त पदांमध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्य़ात ६६५ रिक्त पदे आहेत. त्याशिवाय, कोल्हापूर ५७०, अहमदनगर ५६९, औरंगाबाद ३४२, सांगली ३३४, पश्चिम मुंबई ३११, अमरावती ३०६, जळगाव २६७, उत्तर मुंबई २२५, पालघर २०७, वाशीम २०६, यवतमाळ २००, नंदुरबार १८८, दक्षिण मुंबई १३८, बुलढाणा १२२, नांदेड १०२, धुळे ९७, अकोला ७९, सिंधुदुर्ग ७८, रत्नागिरी, उस्मानाबाद प्रत्येकी ७०, भंडारा, गोंदिया प्रत्येकी ६४, नागपूर, वर्धा प्रत्येकी ५५, बीड ३७, चंद्रपूर ३३, गडचिरोली ३२, लातूर ३१ जालना २० आणि परभणी जिल्ह्य़ात १६ पदे रिक्त आहेत. सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ात शिक्षकांचे एकही पद रिक्त नाही.

सर्व माध्यमिक शाळांची सत्र २०१५-१६ ची ऑनलाइन संच मान्यता करण्यात येत असतांना राज्यातील ४ जिल्ह्य़ांची संच मान्यतेची प्रक्रिया अद्यापही अपूर्णच आहे. त्यात रायगड, ठाणे, पुणे व हिंगोली जिल्ह्य़ांचा समावेश असून, त्यांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यावर रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची संख्या आणखी फुगण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 thousand teachers in the posts vacant