जेवणात विष कालवल्याचा आरोप असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सहा आदिवासींचा नक्षलवाद्यांनी गेल्या वर्षभरापासून छळ चालवला असून, एकाला ठार केल्यानंतर आता चार आदिवासींवर नक्षलवाद्यांच्या निर्देशावरून गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे.
जंगलात वावरणाऱ्या नक्षलवाद्यांनी गेल्या अनेक वर्षांंपासून गावकऱ्यांकडून जेवण मागण्याची पद्धत रूढ केली आहे. गावकऱ्यांची इच्छा असो वा नसो, नक्षलवाद्यांचा निरोप आल्यानंतर त्यांना जेवण पुरवावेच लागते. अशाच एका जेवणावळीच्या दरम्यान गावकऱ्यांनी विषप्रयोग केल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी आरंभलेल्या छळसत्राने आता कळस गाठला आहे. दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील मानेवारा गावजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांनी मुक्काम ठोकला होता. नेहमी प्रमाणे त्यांनी सुमारे ४० सहकाऱ्यांसाठी गावातून जेवण मागितले. गावकऱ्यांनी दिलेले अन्न खाल्ल्यानंतर अनेक नक्षलवाद्यांच्या तब्येती खराब झाल्या. यापैकी काहींवर उपचारासाठी डॉक्टरला बोलवावे लागले. अन्नातून विषबाधा झाल्यामुळेच हा प्रकार घडला असा निष्कर्ष नक्षलवाद्यांनी काढला. या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या या गावातील सहा आदिवासींना नंतर दलमसमोर बोलावण्यात आले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या विषप्रयोगात चळवळीतील दोन सदस्यांचा मृत्यू झाला, असे सांगत या मृत्यूचा ठपका या आदिवासींवर ठेवण्यात आला.
नक्षलवादी नुसते मारहाण करून थांबले नाहीत, तर त्यांनी या सहा आदिवासींचे अपहरण केले. या अपहरणाची तक्रार पोलिसात करायची नाही अशी तंबी गावाला दिली. सुमारे तीन महिने सोबत असलेल्या या आदिवासींकडून ओझे उचलण्याचे काम करून घेण्यात आले. त्यानंतर मानेवारापासून जवळ असलेल्या देवदा गावाजवळ भास्कर महादू हेडो या सहापैकी एका आदिवासीची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या वेळी त्याचे वडीलसुद्धा हजर होते. भास्करच्या मृतदेहावर नक्षलवाद्यांनी विषप्रयोगाचा आरोप करणारे पत्रक सोडण्यात आले.  उरलेल्या पाच आदिवासींना नक्षलवाद्यांनी गावाकडे परत जाऊ दिले नाही. अखेर सततच्या हमालीला कंटाळून यापैकी एका आदिवासीने चळवळीत दाखल होण्याचा निर्णय घेतला.
उरलेल्या चार आदिवासींना गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात गावात परत आणण्यात आले. या चौघांशी गावाने कोणताही व्यवहार करायचा नाही अशी तंबी नक्षलवाद्यांनी दिली. तेव्हापासून हे चार आदिवासी बहिष्काराचे जीवन जगत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
हा सारा घटनाक्रम कळल्यानंतर एटापल्ली पोलिसांनी या गावात जाऊन आदिवासींमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अख्खे गाव दहशतीत असल्याने फारसे काही करता आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
नक्षलवाद्यांना दिलेल्या जेवणात विष कालवण्यात आले नव्हते असे गावकरी आरंभापासून शपथेवर सांगत आहेत. तयार केलेले अन्न गावातून जंगलात नेताना त्यात काही पडले असेल व त्यामुळे अन्न खराब झाले असेल, असे गावकरी सांगतात. नक्षलवादी मात्र या कथनावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सध्या गावात असलेल्या चारही आदिवासींवर नक्षलवाद्यांची पाळत असल्याने या चौघांचे जीणे मुश्कील झाले आहे.

Story img Loader