जिल्ह्य़ातील ९२ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावरील फळ व अन्य पिकांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. केंद्राच्या द्विसदस्यीय पथकाने गुरुवारी जिल्ह्य़ातील ५ गावांचा धावता दौरा केला.
भोकरदन तालुक्यातील अन्वा, जळगाव सपकाळ, वाकडी, कारलावाडी गावांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानीची पथकाने पाहणी केली. बदनापूर तालुक्यातील चनेगाव परिसरात नुकसानीची पाहणी केल्यानंतर पथक परभणीला रवाना झाले. केंद्रीय नियोजन आयोगाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी रामानंद व शास्त्रज्ञ विनोदसिंग यांचा या पथकात समावेश होता. उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व मंजूषा मुथा, तसेच कृषी, महसूल, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते.
जिल्हा प्रशासनाने पथकास दिलेल्या अहवालानुसार २२ फेब्रुवारीपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्य़ातील ९ हजार २०२ हेक्टर फळपिकांचे, तसेच ८३ हजार ४३८ हेक्टर अन्य पिकांचे नुकसान झाले. एकूण ९२ हजार ६४० हेक्टर बाधित क्षेत्रापैकी ३७ हजार २५७ हेक्टर पिकांचे नुकसान ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक, तर ५५ हजार ३८३ हेक्टरवरील नुकसान ५० टक्क्य़ांच्या आतील आहे. निसर्गाच्या संकटात २ व्यक्तींसह २८ जनावरांचा बळी घेतला. सर्वाधिक २३ हजार ५१८ हेक्टर पिकांचे नुकसान जालना तालुक्यात झाले. सर्वात कमी ३ हजार ५९२ हेक्टर नुकसान जाफराबाद तालुक्यातील असून ही सर्व हानी ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. घनसावंगी व अंबड या दोन्ही तालुक्यातफळबागांची लागवड जास्त होती. या दोन्ही तालुक्यांत फळपिकांचे नुकसान ५ हजार ३२३ हेक्टर, म्हणजे जिल्ह्य़ातील फळबागांच्या एकूण हानीपैकी निम्म्यापेक्षा अधिक आहे. बाधित सर्वाधिक १५७ गावे भोकरदनमधील आहेत. भाजीपाला पिकांची हानी ४८१ हेक्टरवर झाली. सर्वाधिक नुकसान कांदापिकाचे आहे. वादळी पावसाने महावितरणचे १ कोटी ९ लाखांचे नुकसान झाले. ७८ गावांतील वीजपुरवठा बंद पडला. पैकी ४५ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत झाला. वादळाने विजेचे ५८७ खांब पडले. मागील १५ दिवसांत जिल्ह्य़ात सरासरी ७५.४४ मिमी पाऊस झाला. यातील सर्वाधिक १३६.७० मिमी पाऊस जाफराबाद तालुक्यातील आहे. अन्य तालुक्यातील पाऊस मिमीमध्ये – जालना ५५.६३, बदनापूर ६२, भोकरदन १३४.७३, परतूर ८४, मंठा ६८.२८, अंबड ७४.१८, घनसावंगी ५५.२१.
जालन्यात ५ गावांना पथकाची धावती भेट
जिल्ह्य़ातील ९२ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावरील फळ व अन्य पिकांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. केंद्राच्या द्विसदस्यीय पथकाने गुरुवारी जिल्ह्य़ातील ५ गावांचा धावता दौरा केला.
First published on: 14-03-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 village visit of squad in jalna