नवा मोंढा येथे शेतीपूरक साहित्य विक्रीच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागून या दुकानातील सुमारे ५० ते ६०लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका दुकानाला प्रथम आग लागली आणि या आगीचे लोट या दुकानात शिरल्यानंतर आगीचा भडका उडाला. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना सुमारे चार तास लागले.

स्वाती विवेक चिद्रावार यांचे विवेक एजन्सीज या नावाचे ठोक व किरकोळ शेतीपूरक साहित्य विक्रीचे नामांकित दुकान आहे. त्या दुकानामध्ये शेतीसाठी उपयुक्त असणारे ठिंबकचे बंडल, स्क्रीन कलर, तुषार पाईप, पीव्हीसी पाईप आणि इतर साहित्य होते. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य प्लास्टिक स्वरूपात होते. खरीप हंगाम संपल्यानंतर आता रब्बी हंगामाला सुरुवात होत असल्याने चिद्रावार यांनी शेतीसाठी लागणार्‍या साहित्यांचा मोठा साठा उपलब्ध करून ठेवला होता. या दुकानाची रुंदी ५० तर लांबी ७० फूट असून सात – आठ मीटर उंचीचे टीनशेडचे दुकान आहे.

या दुकानाच्या पाठीमागील भागात संगीता सुनील राखे यांचे मंगलम ट्रेडर्स या नावाने प्लास्टिक साहित्य (युज अ‍ॅण्ड थ्रो) विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री सर्वप्रथम या दुकानात आग लागली. प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीचा लगेच फडका उडाला आणि विवेक एजन्सीच्या पाठीमागून ही आग या दुकानात शिरली. दोन्ही दुकानामध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्याने आग विझविताना मोठे अडथळे येत होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर विवेक चिद्रावार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अग्नीशमन दलाची एक गाडी आग विझवत होती. परंतु आगीचे तांडव पाहता आणखी तीन गाड्या मागविण्यात आल्या. तसेच एमआयडीसीचे एक वाहन, पोर्टेबल पम्प आणि दोन टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.

Story img Loader