२०१८ मध्ये ५० नक्षलवादी ठार, २९ जणांना अटक
रवींद्र जुनारकर, गडचिरोली</strong>
नक्षलवादविरोधी अभियान राबवताना गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने २०१८ या वर्षांत चांगली कामगिरी करीत ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. २९ जहाल नक्षलवाद्यांना अटक व १८ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. शिक्षण, रोजगार, सहल, प्रशिक्षण या क्षेत्रात भरीव कामगिरी करताना आदिवासींना विश्वास संपादन करून दिल्याने गेल्या ३८ वर्षांतील गडचिरोली पोलीस दलाची ही उत्तम कामगिरी आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी विशेष अभियान राबवून राज्यातच नव्हे तर देशात पोलीस दलाची मान उंचावली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वात एप्रिल महिन्यात बोरिया-कसनासूरच्या जंगलात इंद्रावती नदीच्या पात्रात सर्वाधिक ४० नक्षलवाद्यांना ठार केले. ही कामगिरी सी-६० पथकाच्या नेतृत्वात केली. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली व जहाल नक्षली कमांडर साईनाथ व नंदू यांच्यासह तीन नेत्यांना या चकमकीत ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. नक्षल-पोलीस चकमकीच्या इतिहासात आजवरची ही सर्वात मोठी कारवाई होती.
चकमकी, हत्या, जाळपोळ यासह मारहाणीच्या घटनांमध्ये गेल्यावर्षी घट झाली. नक्षलवाद्यांना पोलिसांनी जंगलाबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे त्यांच्या कारवायांवर मर्यादा आल्या. त्यांना कापडी फलक लावणे व पत्रकं वाटणे यापलीकडे जाता आले नाही. गडचिरोली पोलीस दलाने यावर्षी केवळ नक्षलवाद्यांचा नायनाट केला नाही, तर नक्षलवादविरोधी अभियान राबवताना दुसरीकडे दुर्गम भागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती तसेच विविध समस्या जाणून घेतल्या. तब्बल २५२ जनजागरण मेळावे व ९६ जनसंपर्क कार्यक्रम घेतले. आदिवासी मुला-मुलींसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजना राबवून १६३ मुले व १५३ मुलींना तसेच यामध्ये १२ नक्षलपीडित पाल्य व ७ नक्षलवाद्यांचे नातेवाईक असे एकूण ३१६ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन सहलीचा लाभ देण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे घेतले. त्यातून ८२४ तरुणांना रोजगार मिळाला. तसेच अर्धसैनिक दल व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणामुळे ६७ जण पोलीस दलात तर १२ जणांची निमलष्करी दलात निवड झाली. ५२ नक्षलपीडितांना राज्य परिवहन विभागात विविध पदावर नियुक्त्या झाल्या. आदिवासी युवकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा तसेच आदिवासी विकास दौडचे आयोजन करून विजेत्यांना प्रोत्साहनपर रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सामूहिक विवाह सोहळय़ात १०२ आदिवासी जोडप्यांचे विवाह पार पडले.
सर्वाच्या सहकार्याने यश
२०१८ मध्ये जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या यशाचे संपूर्ण श्रेय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, जवान व सी-६० पथकाला जाते. गडचिरोलीच्या दुर्गम भागात जंगलात कार्य करताना जवानांनी अथक परिश्रम घेतले. पोलीस विभागाच्यावतीने विविध योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या.
– शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, गडचिरोली
मुक्त विद्यापीठाचे केंद्र
स्पर्धा परीक्षा केंद्र व करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्यासोबतच शिक्षणाच्या विविध सोयीसवलती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत दुर्गम भागात विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यातच विद्यापीठाचे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात शिक्षणापासून दुरावलेल्या ६२३ विद्यार्थ्यांना या मुक्त विद्यापीठात प्रवेश देण्यात आला.
पोलीस भरतीत स्थानिकांना प्राधान्य
स्थानिक आदिवासी युवक व इतर जिल्हय़ाच्या युवकांच्या तुलनेत मागे आहे हे लक्षात घेऊन आता स्थानिक म्हणजे गडचिरोलीच्याच युवकांना पोलीस भरतीत संधी देण्यात आली आहे. यासाठी शंभर गुणांची गोंडी व माडिया भाषेची परीक्षासुद्धा घेण्यात येणार आहे. आता होणारी भरती ही या नवीन नियमावलीने होणार आहे.