यंदाच्या वर्षी जिल्ह्य़ात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जेमतेम महिनाभरात एकूण वार्षिक सरासरीच्या ५० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी सुमारे साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो, त्यापैकी जून महिन्यात सुमारे ८०० मिमी, तर जुलत सुमारे १२०० मिमीपर्यंत पावसाची सरासरी असते. यंदा ही एकूण सरासरी आजअखेर गाठत जिल्ह्य़ात पावसाची दमदार आगेकूच चालू आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात एकूण सरासरी ९९ मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे आजअखेर यंदाच्या मोसमातील एकूण सरासरी पाऊस २००२ मिमीवर पोचला आहे. आज सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत मंडणगड तालुक्यात सर्वात जास्त (१६० मिमी) पाऊस पडला असून, त्याखालोखाल दापोली (१०८मिमी), संगमेश्वर (१०५ मिमी), लांजा व राजापूर (प्रत्येकी १०३ मिमी) या तालुक्यांमध्येही पावसाची संततधार चालू आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  
यंदाच्या वर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर (७ जून) कोकणात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर उघडिपीचे काही मोजके दिवस वगळता जिल्ह्य़ात सर्वदूर सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे लावण्यांची कामे झपाटय़ाने पूर्ण होत आली आहेत. यापूर्वी २०११ मध्ये पावसाने चार हजार मिमीची वार्षिक सरासरी ओलांडली होती. गेल्या महिनाभरातील त्याचे सातत्य पाहता यावर्षी वार्षिक सरासरीचा नवा उच्चांक प्रस्थापित होण्याची चिन्हे आहेत.  

Story img Loader