सांगली : ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या जलवाहिनीत शिरल्याने सांगलीतील शामराव नगरमध्ये गॅस्ट्रोसदृश साथीचे ५० रुग्ण आढळून आले. यापैकी केवळ सहा रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, अन्य रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी मंगळवारी दिली.
शामरावनगर भागातील काही गल्ल्यामध्ये कालपासून अतिसार व उलटीचा त्रास होत असल्याचे रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ पाणी तपासणी केली. दूषित पाण्यामुळेच हा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या भागातील पाणी पुरवठा तात्पुरता खंडित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. नागरिकांनाही पाणी उकळून व गाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
महापालिकेच्या वतीने मदरशामध्ये आरोग्य उपचार कक्ष सुरू करण्यात आला असून, घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे २० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी ४४ तर मंगळवारी ६ रुग्ण आढळले होते. यापैकी केवळ सहा रुग्णांना उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. अन्य रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.