दुष्काळामुळे शेतीचे अर्थकारण ढासळले!
दुष्काळाचे परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीची विक्री ५० ते ७५ टक्क्य़ांनी घटली आहे. विशेषत: ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, ट्रॉली अशा यंत्रांची विक्री बंदच झाली आहे. ट्रॅक्टर विक्रीत ५० टक्के घट झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.
दुष्काळाचा परिणाम कृषी संबंधित बाजारपेठेबरोबरच दुचाकी व चारचाकी गाडय़ांच्या खरेदी-विक्रीवरही झाला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत हा परिणाम लक्षणीय आहे. मराठवाडय़ाची अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असून साखर कारखाने, जिनिंग-प्रेसिंग मिल, ऑइल कारखान्यांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील ट्रॅक्टर व दुचाकी विक्रेत्यांनी बाजारपेठेतील ‘मंदी’ची माहिती दिली. ट्रॅक्टर व चारचाकी गाडय़ांच्या क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक मानसिंग पवार म्हणाले की, जागतिक मंदीचा परिणाम मोठय़ा वाहन निर्मिती क्षेत्रावर झाला आहे. या वेळी जागतिक मंदी व दुष्काळ हातात हात घालून आल्याने ग्रामीण व शहरी दोन्ही बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट आहे. पुढील सहा महिने हे सावट कायम राहील, अशी भीती आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील खरेदी-विक्री ३० टक्क्य़ांनी घटली, तर व्यावसायिक वाहनांमध्ये ही घट ४५ टक्के आहे. तालुका स्तरावरही मंदीचे सावट जाणवते. खरे तर ट्रॅक्टरचा वापर बहुउद्देशीय पद्धतीने होतो. गेल्या हंगामात उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे नवीन खरेदीदार पुढे आले नाहीत. ज्यांनी पूर्वी कर्ज घेतले होते, त्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ट्रॅक्टरसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींनी नव्याच अडचणी सांगितल्या. ज्यांनी गेल्या वर्षी ट्रॅक्टर खरेदी केले होते, त्यांनी या वर्षांत कर्जाचे हप्ते भरले नाहीत. हप्ते भरण्यासाठी तगादा केला की, तुम्ही वाहन ओढून घेऊन जा. पैसे येतील तेव्हा नव्याने ट्रॅक्टर घेऊ, अशी भूमिका शेतकरी घेत आहेत. त्यामुळे अर्थकारणाचा गाडा रुतला आहे.
शहरातील महेश टीव्हीएसचे अजय गांधी म्हणाले की, १९६५पासून आम्ही ट्रॅक्टरची विक्री करतो आहोत. पण एवढी मंदी कधीच जाणवली नाही. एका ट्रॅक्टरची किंमत सरासरी ५ ते ७ लाख रुपये आहे. त्याला ट्रॉली, रोटोव्हॅटर, नांगर, मोगडा अशी यंत्रे विकत घेतली तर ८ लाख २५ हजार रुपये शेतकऱ्यांना लागतात. त्याच्या २५ टक्के रक्कम हातात असेल तरच व्यवहार होतील. या वर्षी काही पिकलेच नाही, त्यामुळे एवढी रक्कम कोणाकडेच नाही. आता वित्तीय कंपन्या कर्जदाराची वैयक्तिक माहिती तीन-तीनदा तपासत आहेत. त्यामुळे व्यवसायात मोठी मंदी आहे. पुढचे काही दिवस स्थिती अशीच राहील.
वर्षांला औरंगाबाद शहरातून ४०० ते ४५० ट्रॅक्टरची खरेदी-विक्री एका शोरूममधून होत असे. ते प्रमाण आता २५० ते २७० झाले आहे. अशीच अवस्था दुचाकी वाहनांची आहे. ट्रॅक्टरबरोबरच दुचाकी विक्रीवरही मोठा परिणाम जाणवू लागला आहे. बाजारपेठेत मंदी असल्याने कंपन्यांमध्ये नव्याने भरती नाही. एखाद्या उमेदवाराला नोकरी लागली की, दुचाकीची मागणी आपोआपच वाढते, असा अनुभव आहे. मात्र, नव्याने भरती नाही. आहे त्या कामगारांची कपात होत असल्याने बाजार थंड आहे. पुढील सहा महिने परिस्थिती अशीच राहील, असे व्यापारी सांगतात.
कृषी औजारांची खरेदी-विक्री तर बंदच आहे. मोठे धाडस करायला शेतकरी तयार नाही. पाऊस पडल्यानंतरच बाजारपेठेत काही नवीन घडण्याची आशा आहे. एकूणच पाणीटंचाई आणि घटलेल्या उत्पादनाचा बाजारपेठेवर जाणवणाऱ्या परिणामामुळे अर्थकारण आकसले असल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा