रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिदाल कंपनीच्या तांत्रिक देखभाली काम सुरु असताना एलपीजी ची वायू गळती झाल्याने या जेएसडब्ल्यू कंपनी शेजारील नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वायुच्या त्रासाने काही मुले बेशुध्द पडल्याने मोठे भितीचे वातावरण तयार झाले. याप्रकाराने येथील परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कंपनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
हेही वाचा >>> Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
जेएसडब्ल्यू कंपनी तांत्रिक विभागाच्या देखभालीचे काम सुरु असताना गुरुवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारापासून मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या शाळेतील ५० ते ६० विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या श्वसनाचा आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. यातील ५१ जणांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या शाळे शेजारी जेएसडब्ल्यू कंपनीचा प्लांट आहे. नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हा त्रास प्रथम सुरू झाला. सुरुवातीला या त्रासाची तीव्रता कळली नाही, मात्र जसजसा वेळ गेला तसतसा विद्यार्थ्यांना मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर येथील विद्यार्थिनींना सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बाधित विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच पोटात दुखत होते. मात्र विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत, हे कशामुळे झाले याबत आम्हाला माहिती नाही परंतु वायू गळतीमुळे त्रास होऊ शकतो असे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. या प्रकारांनंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि पालकांची मोठी गर्दी झाली होती.