उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून येणारा पाण्याचा विसर्ग कायम असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात उपयुक्त पाण्याचा साठा ४४.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचला. यापूर्वीचा वजा ५० टक्के व सध्याचा ४४.५४ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा विचारात घेता धरणात गेल्या ५० दिवसांत तब्बल ९४ टक्क्य़ांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाल्याचे दिसून येते.
सलग दोन वर्षांपासून अपुरा पाऊस व दुष्काळ यामुळे सोलापूर जिल्ह्य़ावर पाण्याचे भीषण संकट ओढवले होते. यातच पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा तळाला पोहोचला होता. गेल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत या धरणातील पाणीसाठा वजा ५० टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. परंतु नंतर सुदैवाने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच धरणावरील भागात-पुणे जिल्हय़ात दमदार पाऊस पडत असल्याने परिस्थिती झपाटय़ाने सुधारत गेली.
काल रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात ३६.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तर आज सोमवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहापर्यंत त्यात झपाटय़ाने वाढ होऊन उपयुक्त पाण्याचा साठा ४४.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचला. धरणातील पाण्याची पातळी ४९४.००२ मीटर असून एकूण पाण्याचा साठा २४७८.२५ दलघमी तर उपयुक्त पाण्याचा साठा ६७५.४४ दलघमी इतका झाला आहे. दौंड येथून ४८ हजार क्युसेक, तर बंडगार्डन येथून २८ हजार ४५६ क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा